दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमाअंतर्गत भविष्यासाठी सज्ज  सेवा केंद्राच्या रुपात, नव्याने नूतनीकरण झालेल्या कांदिवली पश्चिमेतील टपाल कार्यालयाचे केंद्रीय दळणवळण मंत्री आणि केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया तसेच केंद्रीय दळणवळण आणि ग्रामविकास राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मसानी यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 24 AUG 2026 9:31PM by PIB Mumbai

 

मुंबई 24 ऑगस्ट 2026

भारताच्या टपालसंबंधी पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत, केंद्रीय दळणवळण मंत्री आणि केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया तसेच केंद्रीय दळणवळण आणि ग्रामविकास राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मसानी यांनी आज भविष्यासाठी सज्ज  सेवा केंद्राच्या रुपात, नव्याने नूतनीकरण झालेल्या कांदिवली पश्चिमेतील टपाल कार्यालयासह, 8 टपाल परिमंडळांमधील इतर 14 टपाल कार्यालयांचे उद्घाटन केले. या प्रसंगी ‘डाक सेवा’ तसेच ‘डाक मित्र’ या अॅप्सच्या सुधारित आवृत्तींची देखील सुरुवात करण्यात आली.

नूतनीकरणाविषयी माहिती

दिनांक 01.04.1965 रोजी स्थापन झालेल्या कांदिवली पश्चिम टपाल कार्यालयाचे सध्याच्या परिसरातील कामकाज वर्ष 2014 पासून सुरु झाले.पारंपरिक टपाल कार्यालयांना समकालीन, ग्राहक-केंद्रित आणि तंत्रज्ञानाने सक्षम सेवा केंद्रांमध्ये रुपांतरीत करून त्यांना भविष्यासाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाने हाती घेतलेल्या ‘जन सेवा कनेक्ट’ या महत्त्वाच्या आधुनिकीकरण उपक्रमांतर्गत हे नूतनीकरण करण्यात आले.

नवी दिल्ली येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरच्या भागीदारीसह हा प्रकल्प हाती घेण्यात आला. अद्ययावत सुविधांमध्ये वाढीव पायाभूत सुविधा आणि आधुनिक अंतर्गत सजावट, सुधारित ग्राहक सेवा, डिजिटल समावेशन तसेच कार्यक्षम सेवा वितरण आणि अधिक मजबूत ब्रँडींगसह दृश्य ओळख यांचा समावेश आहे.

सदर उपक्रमातून भारतीय टपाल विभागाचा सार्वजनिक विश्वासाचा वारसा जतन करत, परंपरेला तंत्रज्ञानाशी जोडून घेण्याची विभागाची कटिबद्धता दिसून येते.

कोट्यवधी ग्राहक आणि विभागाचे ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) यांना मदत करण्यासाठी सुधारित अॅप्सची सुरुवात केल्याबद्दल केंद्रीय दळणवळण मंत्री आणि केंद्रीय डीओएनईआर मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी भारतीय टपाल विभाग तसेच टपाल तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र (सीईपीटी) यांची प्रशंसा केली. डाक मित्र अॅपमध्ये सुधारणा करण्याचा उपक्रम ही जीडीएस कर्मचारीवर्गासाठी, वस्तूंच्या बुकिंगपासून टपाल कार्यालय बचत बँकेतील विविध प्रकारचे व्यवहार करण्यासंदर्भातील  एकात्मिक व्यासपीठ उभारण्याच्या दिशेने उचललेले महत्वपूर्ण पाऊल आहे. सध्या 23 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या सुधारित डाक सेवा अॅपने 10 लाखांहून अधिक डाउनलोड्सचा टप्पा याआधीच ओलांडला आहे आणि हे अॅप सर्वसामान्य नागरिकांना एकाच  मंचावर विविध टपाल सेवा प्राप्त करणे शक्य करून देईल.

'डाक सेवाप्रकल्पांतर्गत 'प्रूफ ऑफ कन्सेप्टम्हणजेच संकल्पनेची प्रायोगिक अंमलबजावणी म्हणून 14 टपाल कार्यालयांचे उद्घाटन केल्याबद्दल त्यांनी ‘भारत टपाल’च्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. त्यांनी  टपाल विभागाने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.  त्यानुसार 2025-26  या वर्षात महसुलात मागील वर्षाच्या तुलनेत 16% वाढ झाली आणि 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत 4,000 कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला गेला.

केंद्रीय दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी ग्राहकांसाठी अद्ययावत 'डाक सेवा' ॲप आणि टपाल कार्यालय कर्मचाऱ्यांसाठी 'डाक मित्र' ॲप सुरू करण्याचे  महत्त्व अधोरेखित केले .  तसेच, नवीन पिढीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी टपाल विभागाने  बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी ‘इंडिया पोस्ट’च्या परिवर्तनासाठी चार  योजना मांडल्या. यामध्‍ये  तंत्रज्ञानामध्‍ये  सुधारणा, धोरणात्मक आराखड्यातील अद्ययावतीकरण, संघटनात्मक मानसिकतेत बदल आणि भौतिक पायाभूत सुविधांचा विकास, यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल  रामचंद्र जायभाये यांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महाराष्ट्र पोस्टल सर्कलचे टपाल सेवक (पुरुष आणि  महिला) आणि कर्मचाऱ्यांना संबोधित केले.

इंडिया पोस्ट: एका वारशाचे नवे रूप

170 वर्षांहून अधिक काळ चालत आलेला वारसा आणि दीड  लाखांहून अधिक टपाल कार्यालयांचे जाळे असलेल्या ‘इंडिया पोस्ट’ने देशभरातील आर्थिक समावेशकता आणि डिजिटल सार्वजनिक सेवांचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून आपले स्थान टिकवून ठेवले आहे. विभागाने 2025-26  मध्ये एकूण टपाल महसुलात 16% ची भरीव वाढ नोंदवली आहे.  ही एक प्रकारे  टपाल कार्यालयामध्‍ये सुरू असलेल्या परिवर्तनाची ताकद आणि प्रासंगिकता दर्शवते.

नूतनीकरण केलेले कांदिवली पश्चिम टपाल कार्यालय या परिवर्तनाचे प्रतीक ठरले आहे – वसाहतकालीन संस्थेपासून ते आधुनिक, कार्यक्षम आणि नागरिकांना प्राधान्य देणाऱ्या सेवा वितरण केंद्रापर्यंतचा हा प्रवास आहे.

***

सुषमा काणे/संजना चिटणीस/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2302962) अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein: English