दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूरमधील नूतनीकरण केलेल्या टपाल कार्यालय इमारतींचे उद्घाटन झाले; सुधारित ‘डाक सेवा’ तसेच ‘डाक मित्र’ या अॅप्सची सुरुवात

Posted On: 24 AUG 2026 8:13PM by PIB Mumbai

 

मुंबई 24 ऑगस्ट 2026

टपाल विभागाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून नागपूर शहर विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीतील शंकर नगर आणि अयोध्या नगर या टपाल कार्यालयांच्या नूतनीकरण केलेल्या इमारतींचे आज उद्घाटन झाले. या प्रसंगी ‘डाक सेवा’ तसेच ‘डाक मित्र’ या अॅप्सच्या सुधारित आवृत्तींची देखील सुरुवात करण्यात आली.

या राष्ट्रीय कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री आणि केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया तसेच केंद्रीय दळणवळण आणि ग्रामविकास राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मसानी सहभागी झाले होते. टपाल विभाग सचिव सुब्रत दास, टपाल सेवा महासंचालक जितेंद्र गुप्ता यांच्यासह टपाल विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील याप्रसंगी उपस्थित होते.

नूतनीकरण करण्यात आलेली शंकर नगर आणि अयोध्या नगर येथील टपाल कार्यालये जन सेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आली असून त्यामध्ये अद्ययावत पायाभूत सुविधा आणि सुधारित ग्राहक सुविधांची तरतूद करण्यात आली आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या टपाल कार्यालयांमध्ये आधुनिक, सोयीस्कर आणि ग्राहक-स्नेही वातावरणात विविध प्रकारच्या टपाल सेवा, बचत बँक, टपाल जीवन विमा आणि इतर सेवा पुरवण्यात येतील.

शंकर नगर येथील टपाल कार्यालयातील कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता राजेंद्र ठाकरे; नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी; नगरसेवक योगेश पाचपोरे; नागपूर विभाग टपाल सेवा संचालक सुधीर जखेरे; टपाल कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक विश्वेश मानकर तसेच शंकर नगर टपाल कार्यालयातील पोस्टमास्तर अविनाश तळवेकर यांनी भाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतनीकरण केलेल्या परिसराची पाहणी केली आणि या कार्यालयात ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला.

नागपूर दक्षिण विभागातील आमदार मोहन मते अयोध्या नगर टपाल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी महाराष्ट्र परिमंडळ मुख्यालयाच्या डीपीएस सिमरन कौर देखील उपस्थित होत्या. नागपूर शहर विभाग टपाल कार्यालयातील ज्येष्ठ टपाल अधीक्षक हमीलपूर शरद कुमार यांनी स्वागतपर भाषण केले आणि उपस्थितांना टपाल विभागाने हाती घेतलेल्या नूतनीकरण तसेच आधुनिकीकरणविषयक उपक्रमांविषयी थोडक्यात माहिती दिली.

सिमरन कौर यांनी यावेळी बोलताना, सुधारित डाक सेवा आणि डाक मित्र या अॅप्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांसह आधुनिकीकरण आणि डिजिटल टपाल सेवांच्या विस्तारासाठी विभागाने हाती घेतलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. नूतनीकरण झालेल्या अयोध्या नगर टपाल कार्यालयातील उद्घाटन फलकाचे यावेळी अनावरण करण्यात आले आणि त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि इतर अधिकाऱ्यांनी अद्ययावत काउंटर्स तसेच इतर सुविधांची पाहणी केली.

सुधारित डिजिटल सेवांसह, नूतनीकरण झालेल्या टपाल कार्यालयांमुळे नागरिकांसाठी उपलब्धता, सोयीस्करपणा, पारदर्शकता तसेच ग्राहक अनुभव यामध्ये सुधारणा होईल.

टपाल विभागाच्या नागपूर शहर विभाग कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला टपाल अधिकारी आणि कर्मचारी, सार्वजनिक प्रतिनिधी, ग्राहक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

***

राधिका अघोर/संजना चिटणीस/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2302941) अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein: English