सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूरमधील राष्ट्रीय परिसंवादात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) क्षमता बांधणी आणि विकासावर लक्ष केंद्रित


सुमारे 130 उद्योजकांना निर्यात, पतपुरवठा, सरकारी योजना आणि व्यवसाय विकासाविषयी देण्यात आली सखोल माहिती

Posted On: 24 AUG 2026 4:19PM by PIB Mumbai


सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास आणि सुविधा कार्यालय (एमएसएमई-डीएफओ), नागपूर यांनी 21 ऑगस्ट 2026 रोजी नागपूरमधील सिव्हिल लाइन्स स्थित चिटणवीस सेंटर येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) क्षमता बांधणीवर एका राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागपूर एमएसएमई-डीएफओचे संचालक डॉ. व्ही. आर. शिरसाट  यांनी भूषवले. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष फारूक अकबानी; कोसिया, नागपूरचे अध्यक्ष जुल्फेश शाह आणि सिडबी, नागपूरचे उपमहाव्यवस्थापक टी. कुलशेखरन हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी), डीजीएफटी आणि आयसीआयबीचे वरिष्ठ प्रतिनिधीदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

या परिसंवादात निर्यात-आयात धोरण, निर्यात प्रोत्साहन, कर्ज सुविधा, महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण, ट्रेड्स (TReDS), खर्च नियंत्रण आणि कपात, नेटवर्किंग आणि सहकार्य, तसेच विकास आयुक्त कार्यालयाच्या (एमएसएमई) विविध योजना यांसारख्या प्रमुख विषयांवर चर्चा झाली. उद्योजकांना या सत्रांमधून व्यवसाय विकास, वित्तपुरवठा, निर्यातीच्या संधी आणि संस्थात्मक सहाय्य यांबद्दल व्यावहारिक माहिती मिळाली.

या कार्यक्रमात सुमारे 130 उद्योजकांनी सहभाग घेतला. वॉकहार्ट हॉस्पिटलच्या सहकार्याने एक आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर आणि हाडांची घनता यांसारख्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने एमएसएमईसाठी उपलब्ध असलेली आपली आर्थिक उत्पादने प्रदर्शित केली. यामुळे सहभागींना उपलब्ध आर्थिक मदतीबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली.

हा कार्यक्रम उद्योजक, सरकारी विभाग, वित्तीय संस्था आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यातील संवादासाठी एक व्यासपीठ ठरला असून यामुळे एमएसएमईसाठी उपलब्ध असलेल्या सहाय्य यंत्रणांबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली. रोटरी क्लब उद्यमी आणि इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस (आयसीआयबी) यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले. नागपूर एमएसएमई-डीएफओचे सहाय्यक संचालक मनीष व्ही. के. झा यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम केले.

***

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2302753) अभ्यागत कक्ष : 25
Read this releasein: English