कृषी मंत्रालय
आयसीएआर–एनबीएसएस आणि एलयूपी, नागपूरचा सुवर्णमहोत्सवी स्थापना दिन साजरा
“आयसीएआर–एनबीएसएस आणि एलयूपी देशाच्या गरजा आणि प्राधान्यक्रमांच्या दिशेने प्रगती करत आहे” — डॉ. एम. एल. जाट
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2026 9:45PM by PIB Mumbai
नागपूर, 23/08/2026
आयसीएआर–नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग (एनबीएसएस आणि एलयूपी), नागपूरने 23 ऑगस्ट 2026 रोजी सुवर्णमहोत्सवी स्थापना दिन साजरा केला. 1976 मध्ये सध्याच्या स्वरूपात या संस्थेची स्थापना होऊन 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी देशातील मृदा संसाधनांचे मॅपिंग, मृदा माहिती निर्मिती आणि भू-वापर नियोजनाच्या क्षेत्रात ब्युरोने दिलेल्या पाच दशकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यात आला.
कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक, नवी दिल्ली येथील डॉ. एम. एल. जाट हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, तर भारतीय खत संघटनेचे महासंचालक डॉ. एस. के. चौधरी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आयसीएआर–एनबीएसएस आणि एलयूपीचे विद्यमान व निवृत्त शास्त्रज्ञ आणि कर्मचारी, इतर आयसीएआर संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी अशा सुमारे 250 जणांनी या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला.
उपस्थितांना संबोधित करताना डॉ. एम. एल. जाट यांनी एनबीएसएस आणि एलयूपीच्या संचालकांसह संपूर्ण परिवाराचे 50 वर्षांच्या समर्पित सेवेसाठी अभिनंदन केले.
ब्युरोच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करताना त्यांनी भारताच्या मृदा संसाधनांचे मॅपिंग आणि भू-वापर नियोजनामध्ये आयसीएआर–एनबीएसएस आणि एलयूपीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. ब्युरोने विकसित केलेला मृदा डेटाबेस आणि माहिती प्रणाली ही पीक सुधारणा, कृषी विकास आणि निर्णय समर्थन प्रणालीसाठी महत्त्वपूर्ण आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.
उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि आधुनिक शेतीला आवश्यक पाठबळ देण्यासाठी कृषी भू-वापर नियोजनातील उत्कृष्टता केंद्राची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. बदलत्या गरजा आणि देशाच्या प्राधान्यक्रमांच्या दिशेने ब्युरो प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. ए. के. नायक यांनी मृदा माहिती आणि संसाधन मूल्यांकन अधिक सक्षम करण्यामध्ये ब्युरोच्या भूमिकेवर भर दिला.
भारतीय खत संघटनेचे महासंचालक डॉ. एस. के. चौधरी यांनी शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी मृदा सर्वेक्षण आणि पेडॉलॉजीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
सुवर्णमहोत्सवी स्थापना दिनाच्या कार्यक्रमामुळे भूतकाळातील आणि विद्यमान शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेण्याची तसेच भारतीय कृषीच्या हितासाठी वैज्ञानिक मृदा संसाधन माहिती आणि शाश्वत भू-वापर नियोजनाला पुढे नेण्याच्या ब्युरोच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. जी. पी. ओबी रेड्डी यांनी आभार प्रदर्शन करून केला.

***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2302572)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English