सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा 33 वा स्थापना दिन साजरा, 900 हून अधिक सफाई कर्मचारी आणि इतर संबंधित घटकांचा सहभाग.

प्रविष्टि तिथि: 23 AUG 2026 7:01PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा 33 वा स्थापना दिन आज राष्ट्रीय राजधानीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे साजरा करण्यात आला. 1994 मध्ये आयोगाची स्थापना झाल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी अशा प्रकारे आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच स्थापना दिन सोहळा आहे.

दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाला 900 हून अधिक सफाई कर्मचारी, केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांचे प्रतिनिधी, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे कल्याण, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या इतर संबंधित घटकांनी उपस्थिती लावली. कायदा आणि न्याय मंत्रालय तसेच संसदीय कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, अनुप वाल्मिकी यांच्यासह विविध मंत्रालये आणि आयोगातील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि कल्याण, धोकादायक पद्धतीने हाताने मैला साफ करण्याचे किंवा स्वच्छता करण्याचे काम पूर्णपणे बंद करणे, यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छतेला प्रोत्साहन देणे, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी उपक्रमांची अंमलबजावणी, या बाबींवर विशेष भर देण्यात आला.

हा स्थापना दिन केवळ एका संस्थेच्या वाटचालीचा उत्सव नाही, तर दररोज देशातील शहरे, गावे, संस्था आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणाऱ्या लाखो स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याची ही संधी देखील आहे, असे यावेळी संबोधित करतांना मंत्री मेघवाल म्हणाले.

त्यांनी अधोरेखित केले की संविधानाची पायाभरणी समानता, प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायावर झाली आहे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना इतर प्रत्येक नागरिकाप्रमाणेच घटनात्मक प्रतिष्ठा आणि समान संधीचा अधिकार आहे. ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला उदरनिर्वाहासाठी असे काम करावे लागू नये, ज्यामुळे त्यांचे जीवन, आरोग्य किंवा प्रतिष्ठा धोक्यात येते, हा राष्ट्राचा संकल्प असला पाहिजे.

‘हाताने मैला उचलणाऱ्या व्यक्तींच्या रोजगारास प्रतिबंध आणि त्यांच्या पुनर्वसनाचा कायदा, 2013’चा संदर्भ देताना मेघवाल म्हणाले की, हा कायदा सामाजिक आणि घटनात्मक जबाबदारीचे प्रतीक आहे. कायद्याचे खरे यश केवळ त्याची निर्मिती करण्यात नसून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आहे, यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाला संबोधित करताना रामदास आठवले यांनी सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण, पर्यावरण स्वच्छ ठेवणे आणि देशाच्या सर्वांगीण कल्याणासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेतली. ते म्हणाले की, प्रत्येक स्वच्छ रस्ता, सुरळीतपणे कार्यरत असलेली सांडपाणी व्यवस्था आणि स्वच्छ सार्वजनिक ठिकाणामागे हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांचे समर्पित प्रयत्न आहेत. आव्हानात्मक परिस्थितीतही हे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहेत.

मंत्र्यांनी अधोरेखित केले की प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याला प्रतिष्ठा, सुरक्षितता, समान संधी आणि सामाजिक न्यायाचा अधिकार आहे. असुरक्षित पद्धतींची जागा तंत्रज्ञानाने घेतली पाहिजे, बंदिस्त जागांमध्ये धोकादायक पद्धतीने प्रवेश करण्याऐवजी यांत्रिकीकरणाचा अवलंब केला पाहिजे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

आठवले यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय आयोगाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचेही कौतुक केले. अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे, तक्रारींची दखल घेणे, क्षेत्रीय भेटी देणे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सरकारांना मार्गदर्शन करणे, यामध्ये आयोग महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

***

शैलेश पाटील/राज दळेकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2302566) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu