वस्त्रोद्योग मंत्रालय
नवी मुंबईतील वस्त्रोद्योग पुनर्प्राप्ती सुविधेचा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून आढावा
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2026 2:46PM by PIB Mumbai
मुंबई, 23 ऑगस्ट, 2026
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी 22 ऑगस्ट 2026 रोजी 'टेक्स्टाईल समिती'च्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई येथील 'टेक्स्टाईल रिकव्हरी फॅसिलिटी'ला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी या केंद्रातील कापड कचऱ्याच्या पुनर्प्राप्ती (रिकव्हरी) प्रक्रियेचा आढावा घेतला आणि संपूर्ण कापड उद्योग साखळीत पुनर्प्रक्रिया व चक्राकार अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या गरजेवर भर दिला. या भेटीदरम्यान, कापड वापरानंतरचा कचरा गोळा करणे, त्याचा मागोवा ठेवणे आणि त्याच्या परिणामांचे मोजमाप करणे यासाठी डिजिटल सर्क्युलर टेक्स्टाईल प्लॅटफॉर्म विकसित करण्याकरिता 'टेक्स्टाईल समिती' आणि 'रिफायबर' यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
प्रकल्पातील भागीदारांशी संवाद साधताना, नैसर्गिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कापड उत्पादनांच्या पुनर्वापरावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला गिरीराज सिंह यांनी दिला. तसेच, हा प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार करण्याचा विचार त्यांनी मांडला.
'टेक्स्टाईल समिती', नवी मुंबई महानगरपालिका, एसबीआय फाऊंडेशन आणि 'तिस्सर आर्टिसन ट्रस्ट' यांनी एकत्रितपणे राबवलेल्या कापड संकलन, वर्गीकरण, अपसायकलिंग आणि रीसायकलिंगच्या उपक्रमाचे गिरीराज सिंह यांनी कौतुक केले. तसेच, कापडांचे त्यांच्या धाग्यांनुसार वर्गीकरण करण्यासाठी 'कोशा'ने (Kosha) विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी भारताने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणि देशाला शाश्वत कापड उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी कापड पुनर्प्राप्तीची मजबूत यंत्रणा उभारणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर मंत्री गिरीराज सिंह यांनी भर दिला.
या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी या केंद्रातील सर्व प्रक्रियांची पाहणी केली; ज्यामध्ये स्वयंचलित वर्गीकरण, धाग्यांची ओळख पटवणे, कापडांचे बारीक तुकडे करणे आणि दुय्यम कच्चा माल पुन्हा मिळवणे या प्रक्रियांचा समावेश आहे. वापरण्यापूर्वीचा आणि वापरल्यानंतरचा कापड कचरा महापालिकेच्या कचरा डेपोत जाण्यापासून रोखण्यासाठी हे केंद्र डिझाइन करण्यात आले आहे.
या प्रसंगी हातमाग विभागाच्या विकास आयुक्त डॉ. एम. बीना, वस्त्रोद्योग आयुक्त आणि टेक्स्टाईल समितीच्या उपाध्यक्ष वृंदा मनोहर देसाई, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, उपमहापौर दशरथ भगत, टेक्स्टाईल समितीचे संचालक व TRF चे प्रकल्प समन्वयक डॉ. तपन कुमार राऊत, आणि तिस्सर आर्टिसन ट्रस्टच्या संस्थापक डॉ. मेघा फणसळकर हे मान्यवर उपस्थित होते.



***
राधिका अघोर/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2302486)
आगंतुक पटल : 43
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English