वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांची निफ्ट मुंबईला भेट; विद्यार्थ्यांशी संवाद

प्रविष्टि तिथि: 22 AUG 2026 10:48PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल (22 ऑगस्ट, 2026) 'राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेला' (निफ्ट), मुंबईला भेट दिली. याप्रसंगी हातमाग विकास आयुक्त डॉ. एम. बीना आणि वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा मनोहर देसाई उपस्थित होते.

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले गिरीराज सिंह आणि निफ्ट मुंबईच्या विद्यार्थ्यांमधील संवाद सत्र. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना रोजगारनिर्मिती, परकीय चलनवाढ आणि निर्यातीला चालना देण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या संवादादरम्यान भारताचा समृद्ध वस्त्रोद्योग व हातमाग वारसा, पारंपरिक ज्ञानाचे जतन, आणि कारागीर व विणकरांसाठी आधुनिक संधींची निर्मिती या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

याशिवाय, वस्त्रोद्योग क्षेत्रात शाश्वतता, घटकांमधील नवोन्मष तसेच नैसर्गिक व संमिश्र धाग्यांचे वाढते महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. वस्त्रोद्योग आणि फॅशन क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि 3 डी प्रिंटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मोठी क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, भारताचा पाया असलेल्या हस्तकला, पारंपरिक ज्ञान आणि डिझाइनचा आधार घेत विद्यार्थ्यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा आवर्जून स्वीकार करावा, असे त्यांनी सांगितले. सर्जनशीलता आणि नवोन्मेषासोबतच उद्योग तसेच व्यवसायाची जोड देण्याची गरज अधोरेखित करत, सिंह यांनी, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवणारे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले.

आपल्या स्वागतपर भाषणात निफ्ट मुंबईचे संचालक प्रा. डॉ. अजित कुमार खरे यांनी विद्यार्थी आणि शासकीय नेतृत्वामधील थेट संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. अशा संवादामुळे नवोदित डिझायनर्सना उद्योगातील घडामोडी, सरकारी धोरणे आणि नव्याने निर्माण होणाऱ्या संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते खारघर येथील निफ्ट मुंबई प्रांगणातच स्थापन करण्यात आलेल्या विणकर सेवा केंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन, हा या दौऱ्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. हा उद्घाटन सोहळा हातमाग विकास आयुक्त डॉ. एम. बीना, भारताच्या वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा मनोहर देसाई, तसेच ज्येष्ठ अधिकारी आणि मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत पार पडला. हे नवीन केंद्र भारतातील हातमाग आणि विणकर समुदायाला मिळणाऱ्या सुविधा व पाठबळाला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

***

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2302432) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English