सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक उद्योजकता दिनानिमित्त एमएसएमई मंत्रालयाद्वारे आयआयटी गोवा इथे उद्योजकता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन


स्टार्ट-अप्स आणि एमएसएमई  उभारण्याबाबत तज्ज्ञ, बँकर, शिक्षणतज्ज्ञ आणि यशस्वी उद्योजकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

प्रविष्टि तिथि: 22 AUG 2026 4:40PM by PIB Mumbai

 

गोवा, 22 ऑगस्ट 2026

जागतिक उद्योजकता दिनाच्या निमित्ताने, भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, एमएसएमई मंत्रालयाने, एमएसएमई विकास आणि सुविधा कार्यालय, डीएफओ,  गोवा यांच्या माध्यमातून 21 ऑगस्ट रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी  गोवा इथे उद्योजकता जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे एक आशादायक करिअरचा पर्याय म्हणून पहावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आणि इच्छुक उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजनांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

हा कार्यक्रम आयआयटी गोवाच्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेल, आयआयआयसी आणि एंटरप्रेन्योरशिप सेल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत, विद्यार्थी, उद्योजक, एमएसएमई क्षेत्रातील संबंधित घटक, धोरणकर्ते, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ हे उद्योजकता, नवोन्मेष आणि व्यवसाय विकासावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते.

एमएसएमई डीएफओ गोवाचे संचालक एम. के. मीना यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एमएसएमई उद्योगांना भौगोलिक सीमांच्या पलीकडे विस्तार करण्यास आणि राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यात डिजिटल कॉमर्सच्या भूमिका कशी महत्वाची आहे, हे त्यांनी सांगितले. एमएसएमई मधील नावीन्य, विकास आणि स्पर्धात्मकतेला चालना देणारी व्यवस्था  निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिक मजबूत सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आयआयटी गोवा इथल्या इन्स्टिट्यूट इनक्युबेशन अँड इनोव्हेशन कौन्सिलचे प्रभारी प्राध्यापक शशीधर संपथियाओ यांनी उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच एमएसएमईंना नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत करण्यासाठी नावीन्य आणि शिक्षण-उद्योगक्षेत्र यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

गोवा एमएसएमई डीएफओ’चे सहाय्यक संचालक रोहित कुमार देबनाथ यांनी स्वागतपर भाषण केले. एमएसएमई आणि तरुण उद्योजकांना स्थानिक बाजारपेठांमधून व्यापक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी संधी निर्माण करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

तांत्रिक सत्रांमध्ये एमएसएमई व्यवस्था, सरकारी सहाय्य योजना आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध संधी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

सहाय्यक संचालक श्रेणी-1, अमर्त्य नारायण चौधरी यांनी बौद्धिक संपदा हक्क (IPR) या विषयावर मार्गदर्शनपर सत्र घेतले. यामध्ये त्यांनी नवोन्मेषक आणि स्टार्ट-अप संस्थापक त्यांच्या कल्पना आणि नवोन्मेषाचे संरक्षण कसे करू शकतात, याबाबत माहिती दिली.

गोवा सरकारच्या उद्योग संचालनालयातील तज्ञ, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इतर उद्योग क्षेत्रांतील तज्ञांनी स्टार्ट-अप निधी, व्यवसायाच्या संधी आणि उद्योजकता विकासासंदर्भात व्यावहारिक मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमात उद्योजकता जागरूकता कार्यक्रमावरही विशेष भर देण्यात आला. हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या उद्योजकता आणि कौशल्य विकास कार्यक्रमाचा (ESDP) एक प्रमुख घटक आहे. इच्छुक उद्योजकांना बाजारपेठ, ई-कॉमर्स, पॅकेजिंग आणि व्यवसायाच्या वाढीच्या इतर पैलूंबद्दल शिक्षित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

विद्यार्थी आणि इच्छुक उद्योजकांनी या सत्रांमध्ये सक्रियपणे भाग घेतला. उद्योजकता, नवोन्मेष आणि डिजिटल कॉमर्समधील उदयोन्मुख संधींबद्दल त्यांना मौल्यवान माहिती मिळाली.

आयआयटी गोव्याचे सहायक कुलसचिव प्रदीप यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा उपक्रम देशभरातील इच्छुक उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीला पाठबळ देणाऱ्या सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची निरंतर वचनबद्धता दर्शवतो.

या कार्यक्रमाला प्रा. शितला प्रसाद, प्रा. बिदान प्रमाणिक, प्रा. केवल रमानी आणि डॉ. जे. एस. प्रभुदेसाई हे देखील उपस्थित होते.

***

राधिका अघोर/राजेश शिरभाते/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302367) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English