शिक्षण मंत्रालय
इग्नूने (IGNOU) व्यवसायाभिमुख सात अभ्यासक्रम केले सुरू; 75 कैद्यांनी घेतला प्रवेश
प्रविष्टि तिथि:
22 AUG 2026 3:22PM by PIB Mumbai
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जुलै 2026 च्या शैक्षणिक सत्रापासून व्यवसायाभिमुख (करिअरवर आधारित) सात नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये दोन पदव्युत्तर पदवी, तीन पदव्युत्तर पदविका, एक पदवी आणि एका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
सुरू करण्यात आलेले नवीनअभ्यासक्रम याप्रमाणे आहेत : एम. एस्सी. (हवामान बदल), हवामान बदलातील पदव्युत्तर पदविका, एम. ए. - महिला आणि लिंगभाव, महिला आणि लिंगभाव अभ्यासातील पदव्युत्तर पदविका, पर्यावरण अभ्यासातील पदव्युत्तर पदविका, ग्रामीण अभ्यास विषयातील पदवी आणि गुन्हेगारी (फौजदारी) न्याय समाजकार्यातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमांमध्ये हवामान बदल, लिंगभाव अभ्यास, पर्यावरणीय शाश्वतता, ग्रामीण विकास आणि गुन्हेगारी (फौजदारी) न्याय सामाजिक कार्य यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
इग्नू (IGNOU) 'मुक्त आणि दूरस्थ शिक्षण' (ODL) तसेच ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमांतून पदवी, पदव्युत्तर, पदविका, पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. या विद्यापीठात 46 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाअंतर्गत, 58 प्रादेशिक केंद्रे आणि 2,382 विद्यार्थी सहाय्यता केंद्रांमार्फत कार्यरत आहे. 'मुक्त विद्यापीठ' श्रेणीतील राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखड्याच्या (NIRF) 2024 आणि 2025 च्या मानांकनांमध्ये या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले असून, त्याला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) कडून 'A++' मानांकन प्राप्त झाले आहे.
इग्नूच्या नागपूर येथील प्रादेशिक केंद्राने, कारागृहातील 75 कैद्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. यापैकी 68 विद्यार्थी नागपूर मध्यवर्ती कारागृहातील आहेत, ज्यात, 11 महिला कैद्यांचा समावेश आहे; तर सात विद्यार्थी अमरावती मध्यवर्ती कारागृहातील आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून, इग्नूच्या सोयीस्कर अशा मुक्त आणि दूरस्थ शिक्षण (ODL) प्रणालीमुळे, कैद्यांना शिक्षा भोगत असतानाच उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते.
जुलै 2026 सत्रातील पीएच.डी. (Ph.D.) कार्यक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याचे देखील इग्नू तर्फे नियोजित आहे; ही परीक्षा सप्टेंबर 2026 च्या शेवटच्या आठवड्यात नागपूर येथे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.
जुलै 2026 शैक्षणिक सत्रासाठीच्या नवीन प्रवेश आणि पुनर्नोंदणीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी IGNOU च्या प्रवेश पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. अभ्यासक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी पुन्हा नोंदणी करणे अनिवार्य असून, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परीक्षेच्या निकालांची वाट पाहू नये, असा सल्ला विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत देण्यात आला आहे.
इग्नूच्या नागपूर येथील प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. लक्ष्मण कुमारवाड यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
***
राधिका अघोर/सविता म्हसकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2302345)
आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English