माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र आणि गोव्यातील पत्रसूचना कार्यालयाने महाराष्ट्राच्या आकांक्षी जिल्हयातील पत्रकारांचा  आयसीएआर -आयएआरआय अभ्यासदौरा केला आयोजित

प्रविष्टि तिथि: 21 AUG 2026 6:29PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2026:

पत्र सूचना कार्यालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागीय कार्यालयांनी, महाराष्ट्राच्या आकांक्षी जिल्ह्यांमधील पत्रकारांचा, नवी दिल्ली अभ्यास दौरा आयोजित केला होता. यात गडचिरोली, वाशिम, धाराशिव आणि नंदुरबार अशा जिल्हयातील प्रत्येकी तीन पत्रकार होते. याच दौऱ्याचा भाग म्हणून, पत्रकारांनी, नवी दिल्लीतील, आयसीएआर- म्हणजेच भारतीय कृषी संशोधन संस्थेलाही भेट देऊन, कृषी क्षेत्रात सुरु असलेले संशोधन, तंत्रज्ञानविषयक प्रगती आणि सध्या भारतीय शेतीसमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या नवोन्मेषांची माहिती  घेतली.

या दौऱ्यामुळे, पत्रकारांना वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची आणि कृषी संशोधन तसेच त्यातील तंत्रज्ञानाचा उपयोग करून, त्यातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कसा उपयोग केला जातो, याची माहिती मिळाली.

आयसीएआर -आयएआरआय चे संयुक्त संचालक (विस्तार) डॉ. आर. एन. पदारिया यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि स्वातंत्र्यकाळापासून भारताच्या कृषी क्षेत्राच्या वाटचालीचा तसेच भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (IARI) स्थापनेपासूनच्या विकासाचा आढावा सादर केला. देशाला स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात भेडसावलेल्या अन्नटंचाईची आठवण करून देताना त्यांनी कृषी संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि शेतकरी-केंद्रित विस्तार सेवांनी भारताचे अन्नटंचाईग्रस्त राष्ट्रापासून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण राष्ट्रात रूपांतर करण्यामध्ये बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची माहिती दिली.

देशात हरित क्रांती यशस्वी करण्यात, डॉ. एम. एस. स्वामिनाथन आणि आयसीएआर चे मोठे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतात, शेतीसाठी प्रदेश- विशिष्ट दृष्टिकोनाची गरज असल्यावर भर देत, त्यांनी आयसीएआर संस्था शेतकरी, राज्य सरकारचे विभाग आणि इतर हितसंबंधियांसोबत त्यांच्या स्थानिक गरजांना अनुरूप तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचे वितरण करण्याचे काम कसे करते, हे ही अधोरेखित केले. हवामान, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत, कृषी पद्धती या सगळ्या गोष्टींमध्ये असलेले प्रदेश निहाय बदल लक्षात घेऊन, त्यानुसार उपाययोजना सांगणे महत्वाचे असते, असेही त्यांनी सांगितले.  याच संदर्भात, संबंधित कृषी तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोग समजून घेत, ते आपापल्या प्रदेशातील शेतकरी आणि ग्रामीण समुदायांपर्यंत पोहोचवण्यात,  महाराष्ट्रातील आकांक्षी जिल्हयातील पत्रकारांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रसूचना कार्यालय, मुंबईच्या उपसंचालक (माध्यम आणि संवाद) जयदेवी पुजारी स्वामी यांनी आयसीएआर -आयएआरआयच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कृषी संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पुढे नेण्यात संस्थेने दिलेले योगदान त्यांनी अधोरेखित केले.

या प्रतिनिधींना, आयसीएआर- आयएआरआय च्या आजवरच्या प्रवासाची माहिती देणारी व्हिडिओ फिल्मही दाखवण्यात आली. या माहितीपटात संस्थेच्या संशोधनविषयक उपलब्धी आणि भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासातील योगदानाची माहिती होती.

यावेळी,  महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सोयाबीनच्या उत्पादकतेत होत असलेल्या घसरणीवर विशेष चर्चा झाली. विशेषतः पिकाच्या वाढीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले.

पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी अल्प कालावधीत तयार होणाऱ्या सोयाबीनच्या वाणांचा विचार करावा, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला. त्यासोबत जीवनदायी सिंचन, आच्छादन (मल्चिंग) आणि सुधारित भू रचना यांसारख्या पूरक पद्धतींचा अवलंब करण्याचेही त्यांनी सुचवले. कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि राज्याच्या कृषी विभागांमार्फत उपलब्ध असलेल्या योग्य वाणांची आणि तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनीही सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.

या प्रतिनिधींनी भारतातील जीएम म्हणजेच, जनुकीय सुधारित अन्न पिकांवरील संशोधनाबाबतही प्रश्न उपस्थित केले. अशा संशोधनासाठी लागू असलेल्या नियामक चौकटीबाबत शास्त्रज्ञांनी माहिती दिली. तसेच, जीनोम एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची प्रतिकारक्षमता आणि उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने संशोधन हाती घेण्यामागील वैज्ञानिक आधाराचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

या सविस्तर चर्चेनंतर, प्रतिनिधी मंडळाने, आयसीएआर-आयएआरआय च्या संरक्षित लागवड, एकात्मिक कृषी प्रणाली आणि सेंद्रिय कृषी सुविधा केंद्रालाही भेट दिली. पाण्याचा प्रभावी वापर करून, बारमाही पीक घेण्यासाठी, हरितगृह-आधारित हायड्रोपोनिक कृषीपद्धतीबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. एकात्मिक शेती मॉडेलमध्ये पिकांसोबत दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, फळ उत्पादन, कृषि-वनीकरण, मधमाशीपालन आणि बायोगॅस यांचा समावेश करून एक हेक्टरच्या शेतातून वर्षभर उत्पन्न आणि रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, नैसर्गिक शेती पद्धतींमध्ये जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर, बाह्य निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करण्यावर आणि शाश्वत कृषी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जातो.

या पत्रकार दौऱ्यात विशेषतः आकांक्षी जिल्ह्यांमध्ये वैज्ञानिक संस्था, प्रसारमाध्यमे आणि शेतकरी समुदाय यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला. उत्पादकता, शाश्वतता आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेत सुधारणा घडवून आणण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुरूप कृषी तंत्रज्ञान आणि नवोन्मेषांचा व्यापक प्रसार सुलभ करणे हा या मागचा उद्देश आहे.

(Source: ICAR-Indian Agricultural Research Institute, New Delhi)

 

 

 

***

सुषमा काणे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302165) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English