नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते बांबोलिम आणि आगासईम येथील दोन जल-उपसा केंद्रांवरील ग्रिड-कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन
या प्रकल्पांमुळे दरवर्षी 18 लाख रुपयांहून अधिक बचत होण्याची आणि 190 टनांपर्यंत कार्बन उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2026 5:55PM by PIB Mumbai
पणजी, गोवा, 21 ऑगस्ट 2026
केंद्रीय ऊर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी, गोवा सरकारच्या पेयजल विभागाच्या बांबोलिम आणि आगासईम येथील जल-उपसा केंद्रांवर बांधण्यात आलेल्या ग्रिड-कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन केले.

बांबोलिम इथे 80 किलोवॅट आणि आगासईम इथे 90 किलोवॅट क्षमतेचे 'ऑन-ग्रिड' सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून, या प्रकल्पांना ‘भारतीय नवीकरणीय ऊर्जा संस्था’ अर्थात (IREDA)च्या ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व’ उपक्रमांतर्गत सहाय्य मिळाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत स्वच्छ ऊर्जेचा वापर अत्यावश्यक सार्वजनिक पायाभूत सुविधांशी, विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या दोन प्रकल्पांची उभारणी म्हणजे केवळ सौर ऊर्जा निर्मितीची उभारणी नाही तर त्यातून, शाश्वत विकास, स्वच्छ ऊर्जा आणि जबाबदार शासन यांसारख्या बाबींचा व्यापक दृष्टीकोण साधण्यात आला आहे, असं उद्घाटनानंतरच्या कार्यक्रमात बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले.

आर्थिक आणि पर्यावरणीय असे दोन्ही प्रकारचे लाभ मिळवण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेची, अत्यावश्यक सार्वजनिक पायाभूत सुविधांशी कशा प्रकारे सांगड घालता येऊ शकते याचे हे दोन प्रकल्प उत्तम उदाहरण आहेत. आपल्या सीएसआर कार्यक्रमाद्वारे या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल 'इरेडा'ची (IREDA) प्रशंसा करतानाच, त्यांनी गोवा आणि देशभरात अशाच प्रकारचे उपक्रम सुरू राहतील, अशी आशा व्यक्त केली.
या दोन्ही प्रकल्पांतून दरवर्षी एकत्रितपणे सुमारे 2.60 लाख युनिट्स इतकी स्वच्छ वीज निर्माण होण्याची अपेक्षा आहे, मात्र हे प्रमाण, सौर ऊर्जेची प्रत्यक्ष निर्मिती आणि जागेवरील परिस्थिती यांवर अवलंबून असणार आहे. सौर ऊर्जेचा अवलंब केल्यामुळे पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होईल आणि पेयजल विभागाची दरवर्षी 18 लाख रुपयांहून अधिक बचत होईल असा अंदाज असल्याचं मत मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

श्रीपाद नाईक यांनी शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, संघटना आणि खाजगी हितधारकांना सौरऊर्जेच्या अधिक संधी शोधण्याचे आणि गोव्यात स्वतंत्र प्रकल्पांऐवजी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा चळवळ उभारण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला सेंट क्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, गोवा राज्य अल्पसंख्याक वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस्को सिल्वेरा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील, IREDA चे प्रतिनिधी, पेयजल विभागाचे मुख्य अभियंता श्री. व्ही. जे. भेंडे, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस, गोवा ऊर्जा विकास संस्था (GEDA) चे व्यवस्थापकीय संचालक गौरीश शंखवाळकर, स्थानिक प्रतिनिधी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
***
सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2302148)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English