दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
प्रधान दूरसंचार लेखा नियंत्रक, मुंबई कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
निवृत्ती वेतनधारकांचे कल्याण, डिजिटल सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवांवर भर
Posted On:
21 AUG 2026 5:34PM by PIB Mumbai
पीआयबी, मुंबई, 21 ऑगस्ट 2026
दूरसंवाद विभाग, संवााद मंत्रालय, केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्रधान दूरसंवाद लेखा नियंत्रक (प्र. सीसीए), मुंबई कार्यालयातर्फे आज सीटीओ इमारत, फोर्ट,मुंबई इथे राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
दूरसंवाद विभाग आणि एमटीएनएलमधील निवृत्ती वेतनधारकांनी भारताच्या दूरसंवाद क्षेत्राच्या वाढीत आणि विकासात दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थितांना संबोधित करताना मुंबई कार्यालयातील प्रधान दूरसंवाद लेखा नियंत्रक कल्पना सिंह यांनी प्र. सीसीए मुंबई कार्यालयाकडून कार्यक्षम, पारदर्शक, सुलभ आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी अनुकूल सेवा देण्याप्रती वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. निवृत्ती वेतनधारकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. यामध्ये संपन्न अर्थात निवृत्ती वेतन लेखा आणि व्यवस्थापन व्यवस्था, डिजीलॉकर, उमंग, सीपीग्राम्स, ई-पीपीओ आणि जीवन प्रमाण यांचा समावेश आहे. निवृत्ती वेतनाशी संबंधित प्रक्रिया अधिक सुलभ करणे, तक्रारींचे वेळेत निवारण करण्यास मदत करणे आणि आवश्यक सेवांपर्यंत निवृत्ती वेतनधारकांची पोहोच अधिक सुलभ करणे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे कार्यालयाचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मुंबई कार्यालयातील दूरसंवाद लेखा नियंत्रक नरेंद्र एस. धाकतोडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सेवेत दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेण्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून डिजिटल समावेशन, सायबर सुरक्षा, आरोग्यविषयक जनजागृती आणि निवृत्ती वेतन सेवांपर्यंत सुलभ प्रवेश याविषयी विविध माहितीपर आणि कल्याणाभिमुख सत्रे घेण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक ऑनलाइन फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांना वाढत्या प्रमाणात बळी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन, मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेतील तज्ज्ञांनी सायबर सुरक्षेबाबत विशेष जनजागृती सत्र घेतले. या सत्रात निवृत्ती वेतनधारकांना ऑनलाइन आणि आर्थिक फसवणुकीच्या विविध प्रकारांबाबत, उद्भवणाऱ्या सायबर धोक्यांबाबत तसेच डिजिटल आणि बँकिंग सेवांचा सुरक्षितपणे वापर करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत जागरूक करण्यात आले.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या पथकाने जिवंत असल्याचे डिजिटल प्रमाणपत्र घरबसल्या मिळविण्याच्या सुविधेबाबत विशेष जनजागृती सत्र घेतले. या सत्रात निवृत्ती वेतनधारकांना आपल्या घरातूनच हे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सोयीस्कर प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
वॉकहार्ट रुग्णालय, मुंबई यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निवृत्ती वेतनधारकांसाठी वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणी आणि विविध आरोग्यविषयक चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली.

या उपक्रमांद्वारे, प्र. सीसीए, मुंबई कार्यालयाने ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतनधारकांच्या लाभासाठी निवृत्ती वेतन, डिजिटल सेवा, आरोग्य आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाची सांगता उपनियंत्रक किर्डक नेहा लक्ष्मण यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
***
सुवर्णा बेडेकर /रेश्मा बेडेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2302128)
अभ्यागत कक्ष : 98