आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
महाराष्ट्र राज्यस्तरीय पदवीपूर्व शल्य चिकित्सा प्रश्नमंजूषा स्पर्धेत, नागपूर एम्स ठरले अव्वल
साडेसात तास चाललेल्या स्पर्धेत, एम्सच्या चमूंनी पटकावला स्व. इंद्रजित मित्रा स्मृती चषक
Posted On:
21 AUG 2026 4:24PM by PIB Mumbai
नागपूर एम्सच्या विद्यार्थ्यांनी, 16 ऑगस्ट ला झालेल्या, 29 व्या स्व. इंद्रजित मित्रा स्मृती महाराष्ट्र राज्यस्तरीय पदवीपूर्व प्रश्नमंजूषा स्पर्धा 2026 मध्ये, अव्वलस्थान मिळवले आहे. नागपूर एम्स इथे, शल्य चिकित्सक संघटनेने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत, राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे 19 संघ सहभागी झाले होते. तब्बल साडे सात तास चाललेल्या या स्पर्धेत, चमूंना अत्यंत कठीण आणि बुद्धीचा कस लावणाऱ्या प्रश्नांना सामोरे जावे लागले.
डॉ. गौरव महमदपूरकर, डॉ. नकुल यादव आणि डॉ. सौम्या पाटीबंदला यांच्या एम्स नागपूरच्या संघाने विजेतेपद पटकावत, स्व. इंद्रजीत मित्रा स्मृती चषकावर आपले नाव कोरले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. पी. जोशी यांच्या हस्ते झाले. नागपूरच्या एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे माजी अधिष्ठाता आणि प्रश्नमंजुषेचे संरक्षक डॉ. सुब्रजित दासगुप्ता, तसेच जीएमसी नागपूरच्या माजी प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. मनोरमा पुरवार यांनी सन्माननीय अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या स्पर्धेमुळे राज्यभरातील पदवीपूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना शल्यचिकित्सा क्षेत्रातील आपले ज्ञान, चिकित्सा आकलन आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता तपासण्याची संधी मिळाली.

शल्यचिकित्सा विभागप्रमुख तसेच अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ दुभाषी यांच्या नेतृत्वाखाली शल्यचिकित्सा विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी एएसएन च्या अध्यक्षा डॉ. दीपा जहागीरदार, एएसएन चे सचिव डॉ. प्रवीण वैरागडे आणि समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची महाजन यांनी सहकार्य केले. शल्यचिकित्सा विभागातील प्राध्यापक आणि शिक्षकवर्गाने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ. दिविश सक्सेना आणि डॉ. नितीन शेर्कर यांनी प्रश्नमंजुषा सूत्रसंचालक म्हणून, तर डॉ. प्रशांत सावरकर यांनी वेळेचे नियोजन आणि गुणपत्रिकांचे व्यवस्थापन केले. डॉ. सौम्या चोप्रा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
एम्स नागपूर चमूची ही यशस्वी कामगिरी, संस्थेसाठी उल्लेखनीय यश असून, संस्थेतील उत्तम शैक्षणिक वातावरण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील शिकण्याची जिज्ञासाच यातून दिसते आहे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेने महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकत्र येण्याची, निकोप शैक्षणिक स्पर्धेत सहभागी होण्याची आणि पदवीपूर्व सर्जरी शिक्षणातील आपली आवड अधिक उन्नत करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
***
सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/परशुराम कोर
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2302061)
अभ्यागत कक्ष : 28