नौवहन मंत्रालय
मुंबई बंदराने केला क्रूझ, मरिना, जहाज बांधणी आणि वॉटरफ्रंट विकासावर जागतिक भागीदारी संवादाचा शुभारंभ
मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) मालवाहतूक परिचालनापलीकडे केलेल्या व्यापार, पर्यटन आणि बंदर-आधारित विकासाच्या विस्ताराच्या अनुषंगाने राजनैतिक मिशनना प्रमुख सागरी संधींविषयी दिली माहिती
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2026 9:40PM by PIB Mumbai
मुंबई, 19 ऑगस्ट 2026
मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल येथे कॉन्सुल जनरल, राजनैतिक मिशनचे प्रतिनिधी, सागरी क्षेत्रातील भागधारक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एका संवाद सत्राचे आयोजन केले. याद्वारे क्रूझ पर्यटन, मरिना विकास, जहाज बांधणी, वॉटरफ्रंट पायाभूत सुविधा आणि सागरी सेवांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्यावर केंद्रित संवादाचा शुभारंभ करण्यात आला. परदेशी मिशन आणि व्यापार प्रतिनिधींना मुंबईचे बंदर आणि महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या मोठ्या संधींशी जोडणे हा मुंबई बंदर प्राधिकरणाद्वारे आयोजित या सत्राचा मुख्य उद्देश होता.

मुंबई बंदराच्या विकासाच्या पुढील टप्प्यात राजनैतिक मिशन्सना थेट सहभागी करून घेणे हा या सत्राचा महत्त्वाचा भाग होता. 150 हून अधिक वर्षांपासून, मुंबई बंदर भारताचे एक प्रमुख सागरी प्रवेशद्वार म्हणून कार्यरत आहे.
मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू यांनी भारतातील सागरी विकासात बंदरांच्या बदलत्या भूमिकेवर भर दिला. आधुनिक बंदरे केवळ मालवाहतुकीपुरती मर्यादित न राहता लॉजिस्टिक, प्रवासी वाहतूक, सागरी पर्यटन, जहाज बांधणी, बंदर-आधारित विकास आणि जागतिक व्यापार सहकार्यापर्यंत आपला विस्तार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“मुंबई बंदराने भारताला 100 हून अधिक देशांशी जोडले आहे. आता हे संबंध मालवाहतुकीच्या पलीकडे क्रूझ पर्यटन, मरीना विकास, जहाजबांधणी तसेच अधिवेशनाची संबंधित पायाभूत सुविधा आणि व्यापक सागरी अर्थव्यवस्थेपर्यंत विस्तारण्याचे आमचे ध्येय आहे, असे ते म्हणाले. आमची ही संकल्पना ‘मेरिटाइम इंडिया व्हिजन 2030’ आणि ‘मेरिटाइम अमृत काळ व्हिजन 2047’ यांच्याशी सुसंगत आहे आणि आम्ही भविष्यातील सहकार्याच्या संधींचा शोध घेण्यासाठी राजनैतिक प्रतिनिधी, व्यापारी संघटना आणि उद्योग भागीदारांचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.
या सत्रादरम्यान चार प्रमुख संधींच्या क्षेत्रांवर चर्चा झाली. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक प्रमुख क्रूझ आणि प्रवासी सुविधा म्हणून अधोरेखित करण्यात आले. 14 हेक्टर जलक्षेत्रात पसरलेल्या आणि 424 यॉट्सची क्षमता असलेल्या प्रस्तावित विकसित भारत मुंबई मरीना संदर्भात सादरीकरणही करण्यात आले. यात यॉटिंग, नौकानयन, सागरी सेवा, आतिथ्य सेवा, यॉट दुरुस्ती आणि वॉटरफ्रंट उपक्रमांमध्ये संधी उपलब्ध आहेत.
मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र आणि व्यावसायिक विकास प्रकल्प हा अधिवेशन, प्रदर्शन, आतिथ्य सेवा आणि व्यावसायिक पर्यटन क्षेत्रातील एक मोठी संधी म्हणून सादर करण्यात आला.

पश्चिम किनारपट्टीवर जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि संबंधित सागरी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राबवण्यात येत असलेला एक प्रमुख उपक्रम म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रीय मेगा जहाजबांधणी क्लस्टरवर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपसंरक्षक कॅप्टन प्रवीण कुमार सिंह यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर एक कॉर्पोरेट चित्रपट दाखवण्यात आला. मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितारमारे आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांनी सादरीकरण केले. मुंबई पोर्ट अथॉरिटीचे वाहतूक व्यवस्थापक विपिन आर. मेनोथ यांनी आभार प्रदर्शन केले.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301394)
आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English