संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

क्रमांक 2 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी, नागपूरने सलग दुसऱ्यांदा जिंकले आंतर-गट स्पर्धा (आयजीसी) चे विजेतेपद


सावनेर येथे आयोजित आंतर-गट स्पर्धा 2026 मध्ये नागपूर गट ठरला विजेता

Posted On: 19 AUG 2026 8:31PM by PIB Mumbai

नागपूर, 19 ऑगस्‍ट 2026

 

क्रमांक 2 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी, नागपूरने प्रतिष्ठित आंतर-गट स्पर्धा (आयजीसी) 2026 मध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावत सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा जिंकली आहे . क्रमांक 2 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी, नागपूरने ही दहा दिवसीय स्पर्धा 4 ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान सावनेर येथे नागपूर गटाचे ग्रुप कमांडर ग्रुप कॅप्टन कुशल व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील तीन प्रमुख युनिट्समधील एअर विंग कॅडेट्स एकत्र आले होते— क्रमांक 1 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी, मुंबई, क्रमांक 2 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी, नागपूर आणि क्रमांक 3 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी, पुणे—यांनी ड्रिल, आरोग्य आणि स्वच्छता, एअरोमॉडेलिंग, 22 रायफल शूटिंग, स्किट शूटिंग आणि तंबू उभारणी यांसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला.

नागपूर गटाने ड्रिलमध्ये सुवर्णपदकही पटकावले, यातून त्यांची शिस्त, समन्वय आणि लष्करी शिस्तबद्धतेतील ताकद अधोरेखित झाली. वैयक्तिक स्पर्धांमध्ये, कॅडेट/सार्जंट खुशबू शरणागत यांनी बेस्ट पायलट (एसडब्ल्यू) मध्ये सुवर्णपदक जिंकले, तर कॅडेट सिद्धी कर्दभाजणे आणि कॅडेट/सार्जंट श्रेष्ठराज प्रसाद यांनी आरोग्य आणि स्वच्छता या प्रकारात सुवर्णपदक मिळवले. कॅडेट मृणाली घागरे यांनी 22 रायफल शूटिंग (एसडब्ल्यू) मध्ये रौप्यपदक जिंकले. या गटाने एअरोमॉडेलिंगमध्ये आपली दमदार कामगिरी कायम ठेवली. या प्रकारात कॅडेट तेजस गणर आणि कॅडेट/सार्जंट रिया तामगडे यांनी स्टॅटिकमध्ये सुवर्णपदक, एलएफसी तेजस चहांदे आणि कॅडेट हर्ष जोरा यांनी कंट्रोल लाईनमध्ये रौप्यपदक, तर कॅडेट/कॉर्पोरल प्रियांशू मेहता आणि कॅडेट/कॉर्पोरल अथर्व चौहान यांनी रिमोट कंट्रोलमध्ये सुवर्णपदक पटकावले. नागपूर गटाने तंबू उभारणीत रौप्यपदक आणि स्किट शूटिंगमध्ये कांस्यपदकही मिळवले.

क्रमांक 3 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी, पुणे यांनी स्किट शूटिंग, 22 रायफल शूटिंग (एसडी) आणि एअरोमॉडेलिंग (कंट्रोल लाईन) मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.  क्रमांक 1 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी, मुंबई यांनीही तंबू उभारणी प्रकारात विजेतेपद पटकावत दमदार कामगिरी केली, तर कॅडेट मेघराज चौधरी यांना सर्वोत्कृष्ट पायलट (एसडी) म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेने कॅडेट्सना शिस्त, अचूकता, तांत्रिक प्राविण्य, सांघिक कार्य आणि स्पर्धात्मक वृत्ती यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक आव्हानात्मक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, जे कठोर एनसीसी प्रशिक्षणातून विकसित झालेल्या उच्च मानकांचे प्रतिबिंब आहे.

नागपूर येथील क्रमांक 2 महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसीचा हा सलग दुसरा विजय, तेथील कॅडेट्स आणि प्रशिक्षण कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक असून, महाराष्ट्र संचालनालयाच्या एअर विंग युनिट्ससाठी ही आणखी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. आयजीसी ही वायू सैनिक कॅम्पच्या पुढील टप्प्यांसाठीच्या निवडीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा देखील आहे. आयजीसी 2026 नंतर, निवडलेले कॅडेट्स प्री-वायू सैनिक कॅम्प (पीव्हीएससी) 1 आणि पीव्हीएससी 2 मध्ये सहभागी होतील. या फेरीत पात्र ठरणारे कॅडेट्स अखिल भारतीय वायू सैनिक कॅम्प (एआयव्हीएससी) मध्ये महाराष्ट्र संचालनालयाचे प्रतिनिधित्व करतील.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2301359) अभ्यागत कक्ष : 31
Read this releasein: English