सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे राष्ट्रपती भवनात समृद्ध लोककला वारशाचे सादरीकरण


स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त 120 कलाकारांकडून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा येथील चैतन्यमय परंपरांचे सादरीकरण

Posted On: 19 AUG 2026 5:42PM by PIB Mumbai

नागपूर, 19 ऑगस्‍ट 2026

 

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे  15 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा भाग म्हणून आयोजित ‘ॲट होम’ कार्यक्रमात  केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे, मध्य भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण लोकपरंपरांचे दर्शन घडवण्यात आले. संचालिका आस्था कार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एकूण 120 कलाकारांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा येथील सांस्कृतिक वारसा बहारदार लोकनृत्य, संगीत, पारंपरिक वाद्ये आणि स्थानिक कलाप्रकारांच्या माध्यमातून सादर केला.

या सांस्कृतिक सादरीकरणात चारही राज्यांमधील विविध पारंपरिक कलाप्रकारांचा मेळ पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या वारशाचे लावणी, कोळी नृत्य, लेझीम, झांज, धनगरी गजा, तुतारी, ढोल-ताशा, दशावतार आणि सोंगी मुखवटे यांच्या माध्यमातून दर्शन घडवण्यात आले. मध्य प्रदेशने भागोरिया, गणगौर, बैगा कर्मा आणि बधाई नृत्य यांचे सादरीकरण केले, तर छत्तीसगडने मुरिया, गेडी, गौर मारिया आणि काकसार नृत्ये सादर केली. गोव्याने समई  नृत्य, घुमट आणि घोडे मोडणी यांद्वारे आपला पारंपरिक वारसा सादर केला. अशा प्रकारे या प्रदेशातील विविध लोकपरंपरांचे एक चैतन्यमय दर्शन घडले. 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक सजावटीने या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. कार्यक्रमास्थळी पारंपरिक रांगोळी, आकाशकंदील, सजवलेले प्रवेशद्वार आणि पानांपासून बनवलेले पारंपरिक तोरण अशी सजावट होती. लोककलांच्या सादरीकरणासोबतच या सजावटीने मनाला आनंद देणारी सांस्कृतिक वातावरण निर्मिती केली आणि या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण कला-परंपरांकडे लक्ष वेधले. 

या कार्यक्रमामुळे दक्षिण-मध्य क्षेत्रातील विविध कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती एकत्र आल्या. त्यांना एका प्रतिष्ठित राष्ट्रीय व्यासपीठावर आपली पारंपरिक कला सादर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे संगीत संयोजन पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरचे संचालक अश्विन दळवी यांनी केले होते, तर नृत्य दिग्दर्शन पुण्याच्या मैत्रयी बापट यांनी केले. दक्षिण-मध्य क्षेत्राचा समृद्ध लोकवारसा, पारंपरिक कलाप्रकार आणि सांस्कृतिक विविधता राष्ट्रीय स्तरावर प्रेक्षकांसमोर आणणे हा या सादरीकरणाचा उद्देश होता.  या सादरीकरणामुळे राष्ट्रपती भवनातील स्वातंत्र्यदिन सोहळ्याची रंगत आणि सांस्कृतिक समृद्धी द्विगुणित झाली. 

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2301273) अभ्यागत कक्ष : 35
Read this releasein: English