युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुधारित 'खेलो इंडिया' योजनेमुळे महाराष्ट्रातील क्रीडा परिसंस्था अधिक होणार बळकट


क्रीडासंबंधी पायाभूत सुविधांचा विस्तार, गुणवंत खेळाडूंचा शोध आणि खेळाडूंना सहाय्य करण्यासाठी 36,441 कोटी रुपयांची योजना; तळागाळापासून जागतिक यशापर्यंतच्या (ग्रासरूट्स-टू-पोडियम) अखंड प्रवासावर भर असल्याचे, 'साई'चे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांचे प्रतिपादन


प्रविष्टि तिथि: 18 AUG 2026 8:05PM by PIB Mumbai

मुंबई, 18 ऑगस्ट 2026

'स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया'च्या (एसएआय-साई) मुंबई प्रादेशिक केंद्राने आज मुंबई प्रेस क्लब येथे 'खेलो इंडिया'च्या सुधारित योजनेबाबत (2026-31) एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या योजनेद्वारे भारताची क्रीडा परिसंस्था बळकट करण्याच्या आणि खेळाडूंसाठी तळागाळातील सहभागापासून ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीपर्यंतचा अखंड मार्ग तयार करण्याच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाबाबत यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला 'साई'चे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे, सहाय्यक संचालक अंकित पाटील तसेच पद्मश्री आणि  मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते प्रमोद भगत, बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते सुकांत कदम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा संपतराव भोसले असे दिग्गज खेळाडू उपस्थित होते.

2026-31 या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या सुधारित 'खेलो इंडिया' योजनेसाठी 36,441 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील तरतुदीच्या तुलनेत सुमारे आठ पट जास्त आहे. सहाय्य मिळणाऱ्या खेळाडूंची संख्या जवळपास दहा पटीने वाढवणे आणि तळागाळातील गुणवत्ता शोधण्यापासून ते उच्च-स्तरीय कामगिरीपर्यंतच्या क्रीडा परिसंस्थेला बळकट करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या परिषदेत बोलताना पांडुरंग चाटे म्हणाले की ही सुधारित योजना म्हणजे खेळाडूंसाठी एक संपूर्ण क्रीडा मार्ग विकसित करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. याद्वारे शाळा आणि तळागाळातील केंद्रांना पद्धतशीर प्रशिक्षण, स्पर्धा आणि उच्च-स्तरीय कामगिरीच्या संधींशी जोडले जाईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती आणि गुणवत्तेचा पाया भक्कम असल्याने, या विस्तारित आराखड्याचा राज्याला मोठा फायदा होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या योजनेत क्रीडासंबंधी पायाभूत सुविधा, स्पर्धा आणि लीग, गुणवत्ता शोध, 'खेलो इंडिया' प्रशिक्षण सुविधा, प्रशिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा विकास, 'फिट इंडिया' मोहीम आणि क्रीडा तंत्रज्ञान यांसारख्या नऊ मुख्य घटकांचा समावेश आहे. योजनेचे पायाभूत सुविधाविषयक धोरण हे पदके जिंकण्याच्या उद्देशाने आवश्यक सुविधा, धोरणात्मक क्रीडा-संबंधी मालमत्तेचे बळकटीकरण आणि क्रीडा-संबंधी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्याचा कृती आराखडा यांवर लक्ष केंद्रित करते.

या आराखड्यांतर्गत, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील क्रीडा प्रकारांसाठीच्या विद्यमान पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण व मूल्यांकन केले जाईल, जेणेकरून त्रुटी, सुधारणेची आवश्यकता आणि नवीन सुविधांची गरज जाणून घेता येईल. राज्याचा कृती आराखडा राज्यांना क्रीडा-संबंधी पायाभूत सुविधांचा विकास आणि बळकटीकरण करण्याच्या कामी अधिक सक्रिय भूमिका बजावण्यास सक्षम करेल.

गुणवत्ता शोध तसेच विकासाचे जाळे विस्तारण्यासाठी या सुधारित आराखड्यात 'खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालये', 'खेलो इंडिया फीडर स्कूल्स' आणि 'खेलो इंडिया सेंटर्स' यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुख्य क्रीडा प्रकारांमधील 'खेलो इंडिया ॲथलीट्स' (KIA) आणि 'इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट्स' (E-KIA) यांना सहाय्य दिले जाईल.

या परिषदेत आपले विचार मांडताना प्रमोद भगत यांनी नियमित खेळाडूंसाठी विशेषतः पॅरा-ॲथलीट्ससाठी दर्जेदार प्रशिक्षण, सुविधा, स्पर्धांचा अनुभव आणि क्रीडा विज्ञान, या गोष्टींवर भर दिला. सुकांत कदम यांनी सुरुवातीच्या टप्प्यावरच गुणवत्ता ओळखणे आणि सातत्यपूर्ण सहाय्य मिळण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला, तर ऋतुजा संपतराव भोसले यांनी नियमित स्पर्धा, दर्जेदार प्रशिक्षण आणि खेळाडूंच्या घरांजवळच सुविधांच्या उपलब्धतेवर भर दिला.

ही सुधारित योजना गुणवत्ता शोध, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्पर्धांच्या संधी यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून खेळाडू तळागाळापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पद्धतशीरपणे प्रगती करू शकतील.


पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर / माधुरी पांगे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2300999) आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English