माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'जेम्स ऑफ इंडिया' चॅलेंज स्पर्धेत गोव्यातील कंटेंट क्रिएटर्सना गोव्याचा वारसा आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्याची संधी मिळणार
जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर 5 लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे
Posted On:
18 AUG 2026 7:32PM by PIB Mumbai
पणजी, 18 ऑगस्ट 2026
"जेम्स ऑफ इंडिया" चॅलेंज स्पर्धेच्या माध्यमातून गोव्यातील कंटेंट क्रिएटर्स (आशय सामग्री निर्माते), व्हिडीओग्राफर आणि कथाकार यांना आपल्या सादरीकरणातून राज्याचा समृद्ध वारसा, संस्कृती, परंपरा आणि पर्यटन स्थळांचे दर्शन घडवण्याची संधी मिळणार आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या देशव्यापी उपक्रमाला वेव्हज ओटीटी (WAVES OTT) अंतर्गत मायवेव्हज (MyWAVES) या नागरिक निर्माता व्यासपीठाचे समर्थन लाभले आहे.
या स्पर्धेअंतर्गत सहभागींना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख, वारसा, पर्यटन स्थळे, परंपरा आणि स्थानिक कथा यावर प्रकाश टाकणारा 1 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ तयार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. स्थानिक आशय निर्मात्यांना 'डिजिटल स्टोरीटेलिंग', म्हणजेच डिजिटल माध्यमातून कथा सांगण्यासाठी प्रोत्साहन देणे, आणि त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमधील आगळ्या कथा आणि सांस्कृतिक वारसा देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी उपलब्ध करून देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
"जेम्स ऑफ इंडिया" चॅलेंजमध्ये वेव्हज अॅपद्वारे सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल ऍप स्टोअर वरून ॲप डाउनलोड करावे, अथवा नोंदणी करावी, त्यानंतर मायवेव्हज विभागात प्रवेश करावा, पुढे प्रोग्राम मॉड्यूलवर जाऊन आपली पूर्ण झालेली व्हिडिओ एन्ट्री सादर करावी. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि रोख बक्षिसे दिली जातील. जिल्हा स्तरावर 50,000 रुपये, राज्य स्तरावर 2 लाख रुपये आणि राष्ट्रीय स्तरावर 5 लाख रुपयांचे बक्षीस आहे.
गोव्यातील आशय निर्माते, व्हिडीओग्राफर आणि कथाकार यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, आणि दृश्य कथाकथनाच्या माध्यमातून राज्यातील आगळ्या कथा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2300984)
अभ्यागत कक्ष : 34