श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (ईपीएफओ) कर्मचारी नोंदणी अभियान 2026 चा प्रारंभ


कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सुविधेपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी नियोक्त्यांना एकदा विशेष संधी

प्रविष्टि तिथि: 17 AUG 2026 5:35PM by PIB Mumbai

पुणे, 17 ऑगस्‍ट 2026

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचारी नोंदणी अभियान (ईईसी), 2026 चा प्रारंभ केला आहे. या अभियानांतर्गत याअंतर्गत 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2026 या कालावधीमधील, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) सामाजिक सुरक्षा कवचाबाहेर पात्र कर्मचाऱ्यांची स्वेच्छा नोंदणी करण्याची, एकदा- एक विशेष संधी नियोक्त्यांना देण्यात आली आहे. हे अभियान 1 जुलै 2026 पासून सुरु झाले असून, 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

याआधीच्या कालावधीतील कर्मचाऱ्यांच्या नोंदणीतील त्रुटी नियमित करणे आणि पात्र कर्मचाऱ्यांना वैधानिक सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कर्मचारी नोंदणी अभियानांतर्गत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियोक्ता पोर्टलद्वारे विहित नमून्यातील ऑनलाइन घोषणापत्र सादर करून, पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करता येऊ शकते. या नोंदणी प्रक्रियेमध्ये चेहऱ्याच्या ओळखीवर आधारित सार सार्वत्रिक खाते क्रमांक (UAN - Universal Account Number) तयार केला जाईल, यासोबतच इलेक्ट्रॉनिक विवरणपत्रोसोबत तात्पुरते विवरणपत्र संदर्भ क्रमांक (TRRN - Temporary Return Reference Number) संलग्न करून ते दाखल केले जातील. यामाध्यमातून या प्रक्रियेच्या अनुपालनासाठी एक सुलभ आणि डिजिटल यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अभियानांतर्गत कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या योगदानासंदर्भात एक महत्त्वाची सवलत दिली गेली आहे. याअंतर्गत जर कर्मचाऱ्याच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाचा हिस्सा कापण्यात आला नसेल, तर अशा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीतील योगदानाचा हिस्सा या अभियानांतर्गत माफ केला जाणार आहे. मात्र अशा प्रकरणांमध्ये, नियोक्त्याने स्वतःचा हिस्सा, लागू असलेले व्याज, प्रशासकीय शुल्क आणि 100 रुपये इतकी रक्कम,  एकरकमी भरपाई म्हणून भरणे आवश्यक असणार आहे.

हे अभियानाच्या माध्यमातून नियोक्त्यांना, या अभियानाअंतर्गत नमूद गेलेल्या कालावधीतील, भविष्य निर्वाह निधीच्या सुविधेपासून वंचित राहिलेल्या पात्र कर्मचाऱ्यांची माहिती स्वेच्छेने जाहीर करण्याची आणि ती नियमित करण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. या उपक्रमामुळे पात्र कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन आणि संबंधित सामाजिक सुरक्षा लाभांसह वैधानिक सामाजिक सुरक्षेचेचे लाभ मिळवून देण्यात उपयुक्त ठरणार आहे.

पुण्यातील, विमान नगर इथल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाने सर्व पात्र नियोक्त्यांना या विशेष संधीचा पूर्ण लाभ घेण्याचे आणि याआधी भविष्य निर्वाह सुविधेपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वैधानिक सामाजिक सुरक्षा चौकटीत आणण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाअंतर्गत दिलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी नियोक्त्यांनी या अभियानासाठी निर्धारीत केलेल्या कालावधीतच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

कर्मचारी नोंदणी अभियान - 2026 ची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सुविधेपासून वंचित राहिलेल्या पात्र कर्मचाऱ्यां नोंदणीसाठी एकदाच विशेष संधी.
  • अभियानाचा कालावधी 1 जुलै 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत.
  • 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील वंचित राहिलेल्या पात्र कर्मचाऱ्यांचा समावेश.
  • वेतनातून कपात न केलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा हिस्सा माफ. 
  • नियोक्त्याला स्वतःचा हिस्सा, लागू व्याज आणि प्रशासकीय शुल्क भरणे आवश्यक.
  • या अभियानांतर्गत 100 रुपयांची एकरकमी भरपाई रक्कम लागू.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना नियोक्ता पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा.
  • सुलभ अनुपालनासाठी चेहऱ्याच्या ओळखीवर आधारित सार्वत्रिक खाते क्रमांक (UAN) तयार केला जाणार तसेच, इलेक्ट्रॉनिक विवरणपत्रोबत विवरणपत्र संदर्भ क्रमांक (TRRN) संलग्न करून दाखल करण्याची सुविधा.
  • कर्मचारी नोंदणी अभियान, 2026 चा लाभ घेऊ इच्छिणारे नियोक्ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियोक्ता पोर्टलवर लॉग-इन करू शकतात.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2300598) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English