ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रनिर्मितीच्या नव्या संकल्पासह एनटीपीसी पश्चिम क्षेत्र - I ने अभिमानाने  साजरा केला 80 वा स्वातंत्र्यदिन.

Posted On: 15 AUG 2026 3:15PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजेच एनटीपीसी पश्चिम क्षेत्र - I यांनी मुंबई येथील निवासी संकुलात देशभक्तीची भावना आणि उत्साह यांनी देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ई. सत्य फणी कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि त्यांनी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि एनटीपीसी समूह सदस्यांना संबोधित केले.

उपस्थितांना संबोधित करताना ई. सत्य फणी कुमार यांनी, ज्यांच्या त्यागातून स्वतंत्र, लोकशाही आणि आत्मनिर्भर भारताचा पाया रचला गेला, अशा स्वातंत्र्य सैनिक, दूरदर्शी नेते आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

राष्ट्राच्या विकास प्रवासात ऊर्जा पुरवठा करण्यातील एनटीपीसीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर, एकात्मिक ऊर्जा कंपनी म्हणून होत असलेल्या एनटीपीसीचे परिवर्तन आणि भारताची ऊर्जा सुरक्षा, परवडणारी आणि शाश्वत ऊर्जा उपलब्धता यामधील योगदान अधोरेखित केले.

एनटीपीसीच्या अलीकडील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेताना, फणी कुमार यांनी एनटीपीसी समूहाने 90 गिगावॉट स्थापित क्षमतेचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असून, 37 गिगावॉटपेक्षा अधिक क्षमतेचे प्रकल्प निर्माणाधीन आहेत, असे नमूद केले. समूहाने आत्तापर्यंत 12.48 गिगावॉटपेक्षा अधिक अक्षय ऊर्जा क्षमता कार्यान्वित केली आहे तर 16.2 गिगावॉट क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प निर्माणाधीन आहेत. 2032 पर्यंत 60 गिगावॉट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने समूह वाटचाल करत आहेत. त्याशिवाय, एनटीपीसीचा अणुऊर्जा क्षेत्रातील वाढता सहभाग तसेच हरित हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक प्रणाली आणि उदंचन(पंप्ड) साठवणूक प्रकल्प यांसारख्या उदयोन्मुख उपक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

पश्चिम विभाग -I चमूची उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करताना, त्यांनी पश्चिम विभाग-I ने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत, 7.85 अब्ज युनिटस् वीज निर्मिती केली असून, गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत त्यात 7% नी वाढ नोंदवण्यात आली आहे. सोलापूर आणि मौदा वीज केंद्रांच्या उत्कृष्ट कार्यचालन क्षमतेचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच ग्रीडची स्थिरता कायम राखण्यामध्ये विभागातील वायू आधारित वीज केंद्रांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.

क्षेत्राची व्यावसायिक यश अधोरेखित करताना त्यांनी डब्ल्यूआर-I ने 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही आर्थिक वर्षांत 100 टक्के देयक वसुली साध्य केल्याचे नमूद केले. त्याशिवाय, सिपत-III, तेलंगणा-II, लारा-III आणि नबीनगर-II यांसारख्या आगामी महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी वीज खरेदी करार करण्यात आल्याचे नमूद केले.

एनटीपीसीच्या सर्वसमावेशक विकासासाठीची वचनबद्धता अधोरेखित करताना, फणी कुमा यांनी विभागाच्या व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांची माहिती दिली. डब्ल्यूआर-I च्या वतीने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा तसेच दादरा व नगर हवेली येथे 139.08 कोटी रुपये मूल्यांच्या 59 सीएसआर प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येत असून, या उपक्रमांत आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता या क्षेत्रांचा समावेश आहे. समूहाच्या महत्त्वाकांक्षी गर्ल एम्पॉवरमेंट मिशन अंतर्गत या वर्षी,243 मुलींना लाभ मिळाला असून, आरजीपीपीएल येथे हा उपक्रम प्रथमच राबवण्यात आला.

संस्थेची ठळक ओळख, प्रतिष्ठा आणि भागधारकांशी संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी व्यावसायिक संचार विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. माध्यमांशी संबंध, धोरणात्मक ब्रँडिंग, अंतर्गत संवाद आणि डिजीटल माध्यमांद्वारे संपर्क या क्षेत्रांत विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंधेरी-वर्सोवा मेट्रो ब्रँडिंग उपक्रम तसेच नाविन्यपूर्ण संवादासाठी टस्कर पुरस्कारामध्ये मिळालेले मानांकन ही विभागाच्या उल्लेखनीय कामगिरीची ठळक उदाहरणे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कर्करोग जनजागृती आणि तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ

भाषणानंतर, सेंटर फॉर कॅन्सर एपिडोमिओलॉजी (सीसीई), अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआरईसी), टाटा मेमोरियल सेंटर यांच्या वतीने प्रस्तावित महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.

एक वर्ष कालावधीच्या कर्करोग जनजागृती आणि तपासणी कार्यक्रमाचा उद्देश समाजामध्ये कर्करोग प्रतिबंध आणि लवकर निदान याविषयीची अधिक जागरुकता निर्माण करणे असा आहे. परस्परसंवादी जनजागृती सत्रांच्या माध्यमातून सहभागी व्यक्तींना कर्करोगाचे जोखमीचे घटक, निरोगी जीवनशैली आणि तंबाखू आणि अल्कोहोल सेवन बंद करणे यांचे महत्त्व यांविषयी मार्गदर्शन कऱण्यात येणार आहे. स्थानिक भाषेतील शैक्षणिक साहित्याचा वापर करून व्यापक पोहोच आणि प्रभावी जनजागृती सुनिश्चित करण्यात येणार आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना आरएचओएचआर, डब्ल्यूआर-I वंदना चतुर्वेदी म्हणाल्या की, आपल्याशी निगडीत समुदायांच्या आरोग्य आणि कल्याण यांना आमच्या बांधिलकीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये या सहकार्यातून कर्करोग प्रतिबंधाबाबत अधिक जागरुकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीच्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. योग्य माहितीच्या माध्यमातून व्यक्ती आणि कुटुंबियांना सक्षम बनवून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सक्रिय  पावले उचलण्यास प्रोत्साहित करण्यास हा उपक्रम हातभार लावेल अशी आम्हाला आशा आहे.

हा उपक्रम प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि समुदायाच्या कल्याणासाठी एनटीपीसी-डब्ल्यूआर-I बांधिलकी अधोरेखित करतो. तसेच, कर्करोगाचे लवकर निदान आणि निरोगी जीवनशैली यांविषयी जनजागृती अधिक बळकट कऱण्यास यामुळे मदत होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम व मुलांचा सहभाग

समारंभाच्या देशभक्तीच्या उत्साहात, सखी महिला समिती आणि बाल भवनच्या मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने भर घातली. या कार्यक्रमात सादरीकरणामध्ये देशभक्तीपर विषयांना प्राधान्य देण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाचे प्रतिबिंब असलेल्या या कार्यक्रमातून दिसून आले शिवाय देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाच्या उत्सवात एनटीपीसी समूहातील सदस्यांना एकत्र आणले.

यावेळी मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये लहानग्या सहभागींनी प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. मुलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम विशेष रंगला आणि उत्साहात पार पडला. भारताच्या इतिहासाला आकार देणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांविषयी जाणून घेण्याची आणि त्यांची भूमिका साकारण्याची संधी या कार्यक्रमातून मुलांना मिळाली.

या कार्यक्रमात एनटीपीसी कर्मचारी, कुटुंबीय, मुले तसेच समूहातील इतर सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यामुळे देशभक्ती, एकता आणि सामूहिक अभिमानाच्या भावनेतून संपूर्ण एनटीपीसी परिवार एकत्रित आला होता.

या कार्यक्रमाला अणुऊर्जा विभागाचे कार्यकारी संचालक  निर्भय गुप्ता, कार्यकारी संचालक ए. पी. सामलआरएचओएचआर च्या वंदना चतुर्वेदी, अणुऊर्जा विभागाचे महाव्यवस्थापक रविंदर सूद, एनजीईएलचे महाव्यवस्थापक आनंद प्रकाश, यांच्यासह डब्ल्यू-I मुख्यालय, अणुऊर्जा, एनजीईएल आणि तपासणी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच कर्मचारी, कुटुंबीय आणि एनटीपीसी परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपाला, समर्पण, एकता आणि जबाबदार कृतीच्या माध्यमातून राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचा, तसेच उत्कृष्टता, शाश्वतता आणि राष्ट्रसेवेची मूल्ये जपण्याचा नव्याने संकल्प करण्यात आला.

***

शैलेश पाटील/विजयलक्ष्मी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2300073) अभ्यागत कक्ष : 26
Read this releasein: English