पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्यातील ZSI च्या पश्चिम विभागीय केंद्रात देशभक्ती, सेवाभाव आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या संकल्पनेत 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Posted On: 15 AUG 2026 9:36PM by PIB Mumbai

 

भारतीय प्राणी सर्वेक्षणच्या (ZSI) पुणे येथील पश्चिम विभागीय केंद्रात 80वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या भावनेने आणि एकजुटीच्या दृढ भावनेने साजरा करण्यात आला. या सोहळ्यात विभागाची देशाशी बांधिलकी, जबाबदारी तसेच भारताच्या समृद्ध जैवविविधतेच्या संवर्धनाप्रती असलेली कटिबद्धता यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत गायनाने झाली. देशभक्तीच्या भावनेने वातावरण भारावून गेले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

या सोहळ्यात ‘तिरंगा वनम्’ हा वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. राष्ट्राला समर्पित भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ‘एक पेड माँ के नाम’ ही संकल्पना राबवण्यात आली.

या वृक्षारोपण उपक्रमातून आईविषयी प्रेम आणि कृतज्ञता, स्वातंत्र्याच्या भावनेप्रती आदर तसेच हरित, शाश्वत आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक बांधिलकी व्यक्त करण्यात आली. राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीत भारताच्या नैसर्गिक वारशाचे आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याचाही समावेश आहे, हा संदेश ‘तिरंगा वनम्’च्या माध्यमातून पश्चिम विभागीय केंद्राने दिला.

या कार्यक्रमातून “स्वातंत्र्य प्रत्येक प्रजातीचा हक्क आहे” हा साधा पण अत्यंत प्रभावी संदेश देण्यात आला. आपण आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना, प्रत्येक प्राणी प्रजातीला जगण्याचे, भरभराटीचे आणि निसर्गाचा समतोल राखण्यात योगदान देण्याचे स्वातंत्र्य मिळेल, असे जग निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे आहे, हे यातून ठसवण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पुणे येथील पश्चिम विभागीय केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बसुदेव त्रिपाठी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व कर्मचारीवर्गाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्वांना समर्पण, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या वृत्तीने संस्थेसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

संस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच देशाच्या व्यापक उद्दिष्टांमध्ये योगदान देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची भूमिका महत्त्वाची आहे. संस्थेचे आणि देशाचे हित सदैव केंद्रस्थानी ठेवून सर्व कर्मचाऱ्यांनी बांधिलकी आणि सांघिक भावनेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायनाने वातावरण देशभक्तीच्या उत्साहाने भारून गेले. कार्यक्रमाचा समारोप कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. संगीत आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणामुळे हा स्वातंत्र्यदिन सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

केंद्राच्या वतीने सर्वांना 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच वैज्ञानिक संशोधन, जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धनाच्या माध्यमातून देशसेवा करण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करणार आला.

***

माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2300071) अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein: English