सांस्कृतिक मंत्रालय
नागपूरमधील केंद्र सरकारी संस्थांमध्ये 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
अनेक केंद्र सरकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण समारंभ, देशभक्तीपर कार्यक्रम आणि लोकसहभागासह 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा
Posted On:
15 AUG 2026 7:51PM by PIB Mumbai
स्वतंत्र आणि लोकशाहीवादी देश म्हणून भारताच्या प्रवासाची आठ दशके पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राने आज 80 वा स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा केला. नागपूरमधील केंद्र सरकारी संस्थांनी या प्रसंगी ध्वजारोहण समारंभ, देशभक्तीपर कार्यक्रम आणि अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उत्साही सहभागासह हा दिवस साजरा केला. आरोग्यसेवा आणि व्यवस्थापनापासून ते आपत्कालीन सज्जता, न्यायवैद्य़क शास्त्र, खाणकाम, उर्जा, दूरसंचार आणि सामाजिक सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत संस्थांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान या कार्यक्रमांतून प्रतिबिंबित झाले. पीआयबी नागपूर सादर करत आहे, शहरातील केंद्र सरकारच्या नऊ संस्थांमध्ये आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यांची झलक.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एआयआयएमएस) नागपूर
एका विशेष समारंभाचे आयोजन करून नागपूरच्या एम्सने 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. या कार्यक्रमात संस्थेच्या वैद्यकीय शिक्षण, संशोधन, रुग्ण सेवा आणि विद्यार्थी विकास या क्षेत्रांतील प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला. एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रा. प्रशांत पी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले; त्यानंतर राष्ट्रगीत झाले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संचलनही केले. संस्थेच्या अलीकडील कामगिरीचा आढावा घेताना, भारतातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत मिळालेले नामांकन आणि एनएबीएचकडून मिळालेली पूर्ण मान्यता अधोरेखित केली. या सोहळ्याचा एक भाग म्हणून निवासी डॉक्टर्स संघटना आणि विद्यार्थी समिती यांच्या संयुक्त सहकार्याने 'रन फॉर युनिटी' मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.




राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अकादमी, नागपूर
एनडीआरएफ अकादमीने 80 वा स्वातंत्र्य दिन, त्यांच्या नव्या सुरादेवी संकुलात देशभक्तीच्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा केला. एनडीआरएफ अकादमीचे संचालक ब्रिगेडियर आर. सत्यनारायणन यांच्या हस्ते, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. 400 हून अधिक कर्मचारी आणि उपस्थितांना संबोधित करताना, ब्रिगेडियर नारायण यांनी स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले व नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण कऱण्याच्या जबाबदारीवर भर दिला. या प्रसंगी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि नागरी संरक्षण दल यांच्या जवानांसाठी विशेष प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी यांमध्ये अकादमी निभावत असलेल्या भूमिकेवरही प्रकाश टाकला.




भारतीय खाण ब्युरो, (आयबीएम) नागपूर
नागपूरच्या भारतीय खाण ब्युरोच्या मुख्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सुरुवात 'वंदे मातरम्' गीताच्या गायनाने करण्यात आली आणि त्यानंतर आयबीएमचे कंट्रोलर जनरल पंकज कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यांनी गेल्या आठ दशकांतील देशाची प्रगती आणि खनिज क्षेत्रातील विशेषतः महत्त्वाच्या खनिज क्षेत्रातील वाढत्या क्षमता यांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय व मुले सहभागी झाले होते. निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.




भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर
नागपूरमधील आयआयएमने राष्ट्रभक्तीची भावना ठेवत उत्साहाने 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. नागपूर आयआयएमचे संचालक प्राध्यापक भीमराय मेत्री यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वजारोहण कऱण्यात आले; त्यानंतर राष्ट्रगीत आणि सुरक्षा दलाचा संचलन सोहळा पार पडला. त्यानंतर शास्त्रीय नृत्य, कविता, गायन, पाश्चात्य नृत्य आणि नाटक अशा विविध कलाप्रकारांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर कऱण्यात आला. या कार्यक्रमात प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांच्या मुलांनी सहभाग घेतला, त्यामुळे या सोहळ्यात समूह भावना प्रतीत झाली.




राष्ट्रीय न्यायवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू), नागपूर
गृहमंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असलेल्या राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या साऊथ अंबाझरी रोड येथील आयटी पार्क परिसरात नागपूर संकुलाने 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. संकुलाचे संचालक प्रा. डॉ. एस. ओ. जुनारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर कविता आणि भाषणे सादर केली. शैक्षणिक समन्वयक डॉ. नीरज कुमार सिंह यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते, यामध्ये प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. स्वतंत्र भारताचा पाया ज्या स्वातंत्रसैनिकांच्या बलिदानातून रचला गेला त्यांना या कार्यक्रमाद्वारे श्रद्धांजली वाहाण्यात आली.



राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ लिमिटेड, (एनटीपीसी), मौदा
एनटीपीसी मौदा येथे 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात 'वंदे मातरम्' या गीताने झाली. त्यानंतर ध्वजारोहण सोहळा, गार्ड ऑफ ऑनर, राष्ट्रगीत गायन आणि संचलन पार पडले. एनटीपीसी मौदा’चे कार्यकारी संचालक व प्रकल्प प्रमुख जोसेफ बॅस्टियन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशाच्या विकासात एनटीपीसीने दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. तसेच एनटीपीसी मौदा परिवारातील उत्कृष्ट कामगिरी, निष्ठा, सुरक्षा आणि सेवा या क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी कार्यक्रमात करण्यात आले.


भारत संचार निगम लिमिडेट नागपूर व्यापारी क्षेत्र
बीएसएनएल नागपूर व्यवसाय क्षेत्रानेही त्यांच्या पीजीएमटी कार्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला. नागपूर बीएसएनएल व्यापारी क्षेत्राच्या महाव्यवस्थापक नम्रता तिवारी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. उपस्थितांनी संबोधित करताना त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले आणि विश्वसनीय दूरसंचार सेवा म्हणून व डिजीटल इंडियाला बळकट करण्यामध्ये बीएसएनएलची असलेली कटिबद्धता अधोरेखित केली. त्यांनी कर्मचाऱ्यांना राष्ट्रनिर्मिती आणि गुणवत्तापूर्ण जनसेवेसाठी समर्पित करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. देशभक्तीपर गीतांनी आणि राष्ट्रगीत गायनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.


जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम संशोधन विकास आणि आरेखन केंद्र (जेएनएआरडीडीसी)
जेएनएआरडीडीसी ने 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहात आणि आस्थेने 15 ऑगस्ट रोजी साजरा केला. इंडियन ब्युरो ऑफ माइन्स चे कंट्रोलर जनरल आणि जेएनएआरडीडीसीचे संचालक पंकज कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर 'वंदे मातरम्' आणि राष्ट्रगीताचे गायन झाले. या कार्यक्रमात कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने सहभाग नोंदवून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. या सोहळ्यात राष्ट्रीय अभिमान, एकता आणि देशाच्या प्रगती व विकासाप्रती असलेली दृढ कटिबद्धता दिसून आली.

दिव्यांग व्यक्तींचे कौशल्य विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरण समग्र प्रादेशिक केंद्र, (सीआरसी- नागपूर)
नागपूरच्या सीआरसीने 80 स्वातंत्र्यदिन, दिव्यांगजन, त्यांचे पालक, मुले, कर्मचारी आणि निमंत्रित पाहुण्यांच्या सक्रिय सहभागासह उत्साहाच्या आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात औपचारिक सलामीने झाली. त्यानंतर नागपूर सीआरसीचे संचालक प्रफुल्ल शिंदे यांच्या राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीत सादर करण्यात आले. राष्ट्रनिर्मिती, सामाजिक समावेशकता आणि दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण यांमधील प्रत्येक नागरिकाची भूमिका संचालकांनी अधोरेखित केली. कर्मचारी आणि लाभार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याची रंगत आणली. पुनर्वसन, सक्षमीकरण, सुलभता आणि सर्वसमावेशक सहभाग यांबाबतच्या नूतन संकल्पासह या कार्यक्रमाची सांगता झाली.

***
माधुरी पांगे/विजयलक्ष्मी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2300068)
अभ्यागत कक्ष : 33