भारताचा लोकपाल
देशाच्या लोकपाल कार्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा, स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी वचनबद्धता केली व्यक्त
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2026 4:25PM by PIB Mumbai
देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताच्या लोकपाल कार्यालयाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या ध्वजारोहण सोहळ्याला लोकपालचे सदस्य न्यायमूर्ती लिंगप्पा नारायणा स्वामी, न्यायमूर्ती संजय यादव, सुशील चंद्रा, न्यायमूर्ती ऋतू राज अवस्थी, पंकज कुमार आणि अजय तिडके उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांनी लोकपालचे सर्व सदस्य, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणानंतर न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. मन भयापासून मुक्त असेल आणि मान अभिमानाने उंचावलेली असेल, अशा स्वरुपाच्या राष्ट्राच्या प्रेरणादायी संकल्पना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मांडली होती, याचे स्मरण त्यांनी करून दिले. नागरिकांनी हे आदर्श पुन्हा आत्मसात करावेत तसेच, विचार आणि कृतीतून त्याचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि असंख्य देशभक्तांच्या अफाट त्यागातून मिळाले आहे, त्यांचे धैर्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले. राष्ट्रध्वज फडकवणे ही केवळ एक औपचारिक कृती नाही, तर देशाचा भूतकाळ आणि स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची गांभीर्याने आठवण करून देणारी कृती आहे, असे त्यांनी सांगितले. भूक, अन्याय, अत्याचार आणि विषमतेपासून मुक्ती मिळणे तसेच, प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळणे म्हणजे खरे स्वातंत्र्य आहे, ही बाब त्यांनी आपल्या संबोधनात अधोरेखित केली.
स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी वचनबद्ध संस्था हीच देशाच्या लोकपालाची भूमिका असल्याची बाब न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली. लोकपालकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची वाढती संख्या म्हणजे, नागरिकांचा वाढता सहभाग आहे, तसेच ते या संस्थेवरील विश्वासाचे प्रतीक आहे असे ते म्हणाले.
संविधान, कायद्याचे राज्य, उत्तरदायित्व, कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सर्वांना सहजतेने उपलब्ध असणे यासाठी लोकपाल वचनबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एक बळकट, कार्यक्षम, पारदर्शक आणि सर्वांना सहजतेने उपलब्ध असलेल्या संस्थेची जडघडण करावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. संविधानाची सेवा करणे, कायद्याचे राज्य टिकवून ठेवणे आणि सार्वजनिक अधिकारांचा वापर जबाबदारीने केला जाईल याची खातरजमा करणे हा लोकपालचा मूलभूत उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक फाईलच्या मागे न्यायाची वाट पाहणारा नागरिक असतो आणि संस्थात्मक निर्णयांचा त्यांच्या जीवनावर परिणाम होत असतो याची जाणीव ठेवून सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने, निपक्षपातीपणे आणि वस्तुनिष्ठतेने पाहायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकपालचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निष्ठा तसेच व्यावसायिक दृष्टीकोनाबद्दल न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांनी या सर्वांचे आभार मानले. या सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
जय हिंद च्या देशभक्तीपर जयघोषाने त्यांच्या संबोधनाची सांगता झाली.





***
माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2300044)
आगंतुक पटल : 9