शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जबाबदारीने राष्ट्रबांधणी करण्याचा संकल्प करत, आयआयटी मुंबईमध्ये 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2026 3:04PM by PIB Mumbai

 

भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयआयटी मुंबईमध्ये, 80 व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात आज, म्हणजे 15 ऑगस्ट 2026 रोजी साजरा झाला. आयआयटी मुंबई परिसरातील नंदन नीलेकणी मुख्य सभागृहासमोरच्या कमानीजवळ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या समारंभाची सुरुवात सकाळी नऊ वाजता आयआय टी चे संचालक प्रा. शिरीष केदारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून करण्यात आली. या वेळी आयआयटी मुंबईचे  माजी विद्यार्थी  सुहास मेहता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी, देशभक्तीच्या वातावरणात राष्ट्रगीत आणि वंदे मातरम सादर करण्यात आले.

देशाचा स्वातंत्र्यदिन, केवळ स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्सव साजरा करणे नव्हे तर सर्व नागरिकांना देशाप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणारा हा प्रसंग आहे, असे, प्राध्यापक केदारे यावेळी म्हणाले. राष्ट्र-बांधणी आपल्या सर्वांच्या रोजच्या कृतीतूनच होते, असे सांगत, समाजात सौहार्द राखणे, भारताच्या विविधतेतील एकतेचा सन्मान करणे, दैनंदिन आयुष्यात शिस्त पाळणे, पर्यावरणाची काळजी घेणे आणि भारतीय वस्तू आणि सेवांचा अधिकाधिक वापर करणे, यातून राष्ट्र उभरणी होत असते, असे केदारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या सगळ्या प्रयत्नातूनच आपण एक आत्मनिर्भर आणि मजबूत देश घडवू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत आज आपल्या विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर असल्याचे सांगत, प्रमुख पाहुणे सुहास मेहता यांनी उपस्थितांना, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असा सल्ला दिला. तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक जबाबदारी, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवेदनशीलता यांचीही जोपासना होईल, याकडेही लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी अभियंते, शास्त्रज्ञ आणि उद्योजकांना केले. भारताने केवळ आर्थिक समृद्धीचे ध्येय न ठेवता अधिक विवेकी आणि मूल्याधिष्ठित समाज बनण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

भारताच्या विविधतेतून एकतेचे दर्शन घडवणारे रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.

या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आयआयटी मुंबईच्या अधिकाधिक सदस्यांना सहभागी होता यावे, यासाठी या कार्यक्रमाचे संस्थेच्या यूट्यूब  चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.

संपूर्ण परिसराची, तिरंग्याच्या रंगांच्या रोषणाईने आणि सजावटीने आकर्षक सजावट करण्यात आली होती. भारताची प्रगती, समृद्धी आणि राष्ट्रनिर्माणासाठी योगदान देण्याच्या  संकल्पासह या सोहळ्याची सांगता झाली.

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानंतर आयआयटी मुंबई, कर्मचारी उत्कृष्टता पुरस्कार (IITB-SEA) प्रदान करण्यात आले. 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या पुरस्कारांचा उद्देश, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणे हा आहे. यावेळी  रमेश बोके यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान प्रदान करण्यात आला, तर विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत आणि सांघिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आयआयटी मुंबईचे संचालक आणि प्रमुख पाहुणे यांनी वर्षा विनोद म्हापणकर, वृषाली दत्ताराम सणसरे,  प्रकाश भास्कर रानडे आणि तबस्सुम जाहिद माजगावकर यांचा संस्थेत, 40 वर्षांची समर्पित सेवा पूर्ण केल्याबद्दल सत्कार केला.

***

माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2299991) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English