रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्य रेल्वेतर्फे 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, महाव्यवस्थापक  राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते मध्य रेल्वे मुख्यालयात राष्ट्रध्वज वंदन

Posted On: 15 AUG 2026 3:08PM by PIB Mumbai

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी आज 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वे मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवला.

महाव्यवस्थापकांनी आरपीएफच्या संचलनाचे निरीक्षण केले आणि उपस्थितांना संबोधित करताना सर्व रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच मान्यवर प्रवासी आणि रेल्वेसेवा वापरणाऱ्या नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्राच्या प्रगती आणि विकासात मध्य रेल्वेने दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अभिमान व्यक्त केला.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची दखल घेत महाव्यवस्थापकांनी सांगितले की गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले असून, याचे श्रेय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांना जाते. दुर्गम भागात तसेच आव्हानात्मक परिस्थितीत दिवस-रात्र काम करून रेल्वे व्यवस्था सुरक्षित ठेवणाऱ्या आणि रेल्वेच्या कामकाजात अमूल्य योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे त्यांनी कौतुक केले. प्रवासी सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत महाव्यवस्थापकांनी सांगितले की गाड्यांची वेळेवर धावण्याची सुनिश्चितता हे अजूनही एक महत्त्वाचे आव्हान आहे. त्याचबरोबर सर्व परिस्थितीत सुरक्षितता आणि सुरक्षाव्यवस्था सुनिश्चित करणे हे मध्य रेल्वेचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे.

आपल्या भाषणात महाव्यवस्थापकांनी मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागीय सायबर सेलमधील मुख्य जमादार शंकर शिवस्वामी एडले यांचेही अभिनंदन केले. 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली येथे भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे.

यावेळी महाव्यवस्थापकांनी मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या विविध कल्याणकारी उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आपल्या कर्तव्याप्रती समर्पण आणि बांधिलकी जपणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मध्य रेल्वेच्या कामगिरीला प्रभावीपणे अधोरेखित करून ती जनतेसमोर मांडल्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांचेही आभार मानले.

महाव्यवस्थापकांनी मुख्य मार्गावरील सीएसएमटी-कर्जत/खोपोली विभागातील 22 उपनगरीय सेवांचे 12 डब्यांवरून 15 डब्यांच्या गाड्यांमध्ये उन्नतीकरण करण्याची घोषणा केली. यामुळे मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या सेवांची एकूण संख्या 54 होणार आहे. तसेच 11 माल आणि प्रवासी गाड्यांना नियमित गाड्यांचा दर्जा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याचा प्रवाशांना लाभ होणार आहे.

कार्यक्रमात मध्य रेल्वे आरपीएफच्या श्वान पथकाने विशेष प्रात्यक्षिक सादर केले. यात महाव्यवस्थापकांचे स्वागत, अग्नी अडथळा ओलांडण्याचे प्रात्यक्षिक, भारतीय ध्वजाची ओळख आदी प्रात्यक्षिकांचा समावेश होता. मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीच्या कलाकारांनीही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुसळधार पावसाने कलाकारांचा उत्साह कमी केला नाही आणि दोन्ही प्रात्यक्षिके व कार्यक्रम मुसळधार पावसातही सुरू राहिले. स्वातंत्र्याच्या भावनेचे प्रतीक म्हणून महाव्यवस्थापकांच्या हस्ते तिरंगी फुगेही आकाशात सोडण्यात आले.

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ) अध्यक्ष स्निग्धा श्रीवास्तव,  सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ च्या कार्यकारी सदस्य, अतिरिक्त सरव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान विभागप्रमुख, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

***

माधुरी पांगे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2299987) अभ्यागत कक्ष : 34
Read this releasein: English