दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
विद्यार्थ्यांना टपाल तिकीट संग्रह करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाची 2026-2027 या वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर
Posted On:
14 AUG 2026 5:07PM by PIB Mumbai
विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संग्रहाविषयी रुची निर्माण करण्यासाठी टपाल विभागाने एक शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. 'दीनदयाळ स्पर्श योजने'अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या शिष्यवृत्तीचा उद्देश टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाबाबत विद्यार्थ्यांची अभिरुची वाढवणे आणि त्यासंबंधी संशोधनाला चालना देणे हा आहे. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी चांगली आहे आणि जे टपाल तिकीट संग्रह हा छंद म्हणून जोपासत आहेत, अशा इयत्ता 6 वी ते 9 वी मधील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. यासाठी विभागाच्या परिमंडळ कार्यालयांद्वारे टपाल तिकीट संग्रहविषयक प्रश्नमंजुषा आणि प्रकल्प यांचे आयोजन केले जाणार आहे.
पात्रता अटी:
या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार भारतातील एखाद्या मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थी (इयत्ता 6 वी ते 9 वी) असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या शाळेत 'फिलाटेली क्लब' असणे आणि तो विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असणे गरजेचे आहे. जर शाळेत फिलाटेली क्लब स्थापन झालेला नसेल, तर ज्या विद्यार्थ्याचे स्वतःचे 'फिलाटेली डिपॉझिट खाते' आहे, अशा विद्यार्थ्याचाही विचार केला जाऊ शकतो. तसेच, उमेदवाराची शैक्षणिक कामगिरी चांगली असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड करताना, उमेदवाराने मागील अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण किंवा त्यास समतुल्य श्रेणी (ग्रेड ) मिळवलेली असावी. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रिया 27 सप्टेंबर 2026 रोजी नियोजित असून, दोन टप्प्यांची असेल. पहिल्या टप्प्यात प्रादेशिक स्तरावर 'फिलाटेली' (टपाल तिकीट संग्रह) विषयावर आधारित लेखी प्रश्नमंजूषा घेतली जाईल; तर दुसऱ्या टप्प्यात, प्रादेशिक स्तरावरील लेखी प्रश्नमंजूषेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम निवडीसाठी 'फिलाटेली' विषयावर प्रकल्प सादर करावा लागेल.
अभ्यासक्रम:
फिलाटेली विषयावरील लेखी प्रश्नमंजूषा ही 'बहुपर्यायी प्रश्नांवर' आधारित असेल. यात चालू घडामोडी, इतिहास, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, भूगोल आणि फिलाटेली (स्थानिक आणि राष्ट्रीय) या विषयांवरील एकूण 50 प्रश्नांचा समावेश असेल. फिलाटेली प्रकल्प चार ते पाच पानांपेक्षा जास्त नसावा. या प्रकल्पात उमेदवार जास्तीत जास्त 16 टपाल तिकिटे आणि 500 शब्दांचा वापर करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांसाठी फिलाटेली लेखी प्रश्नमंजूषेची घोषणा झाल्यानंतर, प्रकल्पाबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना आणि नमुना आराखडा संबंधित 'परिमंडळ कार्यालयांद्वारे' जारी केला जाईल.
अर्ज सादर करण्याची संभाव्य तारीख 15.09.2026 आहे आणि सर्व अर्ज केवळ 'स्पीड पोस्ट'द्वारेच "वरिष्ठ अधीक्षक, टपाल कार्यालये, गोवा विभाग, पहिला मजला, टपाल भवन, पणजी-गोवा--403001" या कार्यालयात सादर करायचे आहेत.

***
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2299569)
अभ्यागत कक्ष : 26