माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भंडारा येथे आयोजित केंद्रीय संचार ब्युरोच्या मल्टिमिडीया प्रदर्शनाला विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्साही प्रतिसाद


व्हर्च्युअल रिॲलिटी विषयक अनुभव, स्पर्धा आणि 'हर घर तिरंगा' उपक्रमांनी जनसंपर्क कार्यक्रमाचा  प्रभाव वाढवला

Posted On: 14 AUG 2026 3:28PM by PIB Mumbai

 

केंद्रीय संचार ब्युरो (सीबीसी) क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांच्या वतीने आयोजित एकात्मिक संवाद आणि संपर्क कार्यक्रमांतर्गत (आयसीओपी) आयोजित तीन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांचा उत्साही सहभाग दिसून आला. या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. भंडारा बस स्थानकावर आयोजित या प्रदर्शनात मल्टीमीडिया डिस्प्ले, डिजिटल प्रदर्शने आणि परस्परसंवादी उपक्रमांच्या माध्यमातून सरकारच्या 12 वर्षांमधील कामगिरीचे, 'व्हीबी-जीरामजी' आणि 'हर घर तिरंगा' मोहीम यांचे दर्शन घडवले आहे.

विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) अनुभव, यामुळे त्यांना आकर्षक डिजिटल सामग्रीद्वारे सरकारच्या प्रमुख उपक्रमांची माहिती घेता आली. या नाविन्यपूर्ण प्रदर्शनाने तरुण अभ्यागतांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण केली आणि विविध सरकारी योजनांविषयीची त्यांची समज वाढवली.

2026 या वर्षी 'हर घर तिरंगा' मोहिमेचे पाचवे आयोजन साजरे करण्यासाठी, या देशव्यापी मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी अनेक जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.  याद्वारे त्यांना स्वातंत्र्यदिन अभिमानाने साजरा करण्यासाठी आणि देशभक्तीची भावना आणि तिरंग्याबद्दलचा आदर वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

उत्सवाच्या उत्साहात भर घालत, सीबीसी पीआरटी पथकाने सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, व्हीबी-जीरामजी आणि हर घर तिरंगा मोहिमेवर आधारित कार्यक्रमांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय ज्ञान, सर्जनशीलता आणि देशभक्तीची भावना प्रदर्शित केली. विजेत्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रदर्शनात जिल्हा प्रशासनाने उभारलेले माहितीपर स्टॉल्स देखील आहेत. यात व्हीबीजीरामजी, स्वयं-सहायता गट आणि आरोग्य विभागाचे उपक्रम यांचे प्रदर्शन आहे. यामुळे अभ्यागतांना विविध नागरिक-केंद्रित सेवा आणि कल्याणकारी कार्यक्रमांची माहिती मिळत आहे.

हे प्रदर्शन 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, आणि सरकारचे महत्वाकांक्षी  उपक्रम आणि विकासाच्या प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या मल्टिमिडीया प्रदर्शनाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आहे.

*** 

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2299475) अभ्यागत कक्ष : 23
Read this releasein: English