अणुऊर्जा विभाग
इंडियन कॅन्सर सोसायटी आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाद्वारे ‘अमृत स्पर्श’चा
मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ट्यूमरच्या रुग्णांसाठी समर्पित 'न्यूरो-ऑन्कोलॉजी पुनर्वसन केंद्र'
Posted On:
13 AUG 2026 8:11PM by PIB Mumbai
मुंबई, 13 ऑगस्ट 2026
कर्करोगग्रस्तांच्या सर्वसमावेशक पुनर्वसनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, इंडियन कॅन्सर सोसायटी (आयसीएस) आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाने(टीएमएच) आज मुंबईतील परळ येथील आयसीएस पुनर्वसन केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर एका अत्याधुनिक, समर्पित 'न्यूरो-ऑन्कोलॉजी पुनर्वसन केंद्राचे' उद्घाटन केले. हा उपक्रम इंडियन कॅन्सर सोसायटीच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधून सुरू करण्यात आला असून, देशातील अशा प्रकारच्या पहिल्या पुनर्वसन केंद्रातील सेवांचा हा एक विस्तार आहे.

या अत्याधुनिक सुविधा केंद्राचे अधिकृत उद्घाटन आशियाई न्यूरो-ऑन्कोलॉजी सोसायटीचे (ASNO) अध्यक्ष डॉ. राकेश जलाली आणि भारतीय न्यूरो-ऑन्कोलॉजी सोसायटीचे (ISNO) अध्यक्ष डॉ. दत्तात्रय मुझुमदार यांच्यासह आयसीएस आणि टीएमएचच्या इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
S26R.jpeg)
हे नव्याने उद्घाटन करण्यात आलेले केंद्र पारंपरिक भौतिकोपचार आणि ‘ऑक्युपेशनल थेरपी’च्या पलीकडे जात, प्रगत ‘व्हर्च्युअल सेन्सरी’ वातावरण आणि समर्पित ‘कॉग्निटिव्ह’ प्रयोगशाळा उपलब्ध करून देत आहे. त्यासोबतच, हे केंद्र रुग्णांना आणि कर्करोगातून सावरलेल्या व्यक्तींना पुन्हा स्वावलंबी बनण्यासाठी आणि त्यांना त्यांचे कुटुंब, समाज आणि दैनंदिन जीवनात पुन्हा पूर्वीप्रमाणेच मिसळण्यास मदत करण्यासाठी आयसीएस सेवांच्या माध्यमातून सर्वसमावेशक पुनर्वसन सहाय्य प्रदान करणार आहे.
हे विशेष केंद्र मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या ट्यूमरशी संबंधित गुंतागुंतीच्या मज्जासंस्थेशी आणि शारीरिक कार्यक्षमतेशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी कार्य करेल; यामध्ये जागा/दिशेचे भान नसणे, शरीराचा समतोल बिघडणे आणि संवेदन प्रक्रियेत होणारे बदल यांचा समावेश आहे.
हे केंद्र एकाच छताखाली प्रगत फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड लँग्वेज थेरपी, ऑडिओलॉजी आणि कॉग्निटिव्ह पुनर्वसनासह दैनंदिन जीवनातील क्रियांचे प्रशिक्षण यांचा समावेश असलेल्या मल्टीडिसिप्लिनरी केअर मॉडेलचे अनुसरण करते.
AJJL.jpeg)
या प्रसंगी बोलताना टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक (अकॅडेमिक्स) डॉ. लस्कर म्हणाले, ‘टाटा मेमोरियल सेंटरमध्ये आमचा असा विश्वास आहे की, कर्करोगाच्या सर्वसमावेशक उपचारांचा विस्तार केवळ आजारावर उपचार करण्यापुरता मर्यादित नसून शारीरिक कार्यक्षमता, स्वावलंबन आणि जीवनमान पूर्ववत करण्यापर्यंत आहे. मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या ट्यूमरच्या रुग्णांना उपचारादरम्यान आणि उपचारानंतर गुंतागुंतीच्या शारीरिक, कॉग्निटिव्ह, संवादात्मक आणि मानसिक-सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. ‘अमृत स्पर्श’ची स्थापना कर्करोगाच्या सर्वसमावेशक उपचारांच्या चौकटीत विशेष न्यूरो-ऑन्कोलॉजी पुनर्वसनाचा समावेश करून ही अखंड सेवा साखळी अधिक मजबूत करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला दर्शवते.’
‘आयसीएस या विशेष केंद्राच्या माध्यमातून रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या गुंतागुंतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आयसीएसच्या (ICS) सचिव आणि व्यवस्थापकीय विश्वस्त उषा थोरात यांनी सांगितले.
‘मेंदू किंवा पाठीच्या कण्याच्या ट्यूमरवर यशस्वी उपचार करणे म्हणजे केवळ आजारावर नियंत्रण मिळवणे नव्हे; तर रुग्णांना त्यांची शारीरिक कार्यक्षमता, स्वावलंबन आणि जीवनमान पुन्हा मिळवून देण्यात मदत करणे देखील आहे. ‘अमृत स्पर्श’ शारीरिक, संज्ञानात्मक, संभाषण, घास गिळणे आणि इतर आव्हानांवर मात करण्यासाठी विशेष पुनर्वसन सेवा एकत्र आणते, ज्यामुळे रुग्णांना सावरण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात परत येण्यासाठी मदत होते, यावर टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉ. अलियासगर मोइयादी यांनी भर दिला.
हे केंद्र समर्पित मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि पाठबळ देणाऱ्या गटांच्या माध्यमातून मानसिक-सामाजिक आणि समुपदेशन सहाय्य प्रदान करेल. योग आणि व्यवसाय पुनर्वसन या केंद्राच्या पुनर्वसनाच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाला अधिक बळकट करेल.
दोन्ही संस्थांच्या ध्येयाला अनुसरून हे केंद्र परवडणारे उपचार मिळवून देण्याची खातरजमा करेल. गरजू रुग्णांना पुनर्वसन सेवा मोफत पुरवल्या जातील आणि इतर रुग्णांसाठी अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातील. या उपचार केंद्रामध्ये या क्षेत्रातील प्रशिक्षित विशेष थेरपिस्टद्वारे सेवा दिल्या जातील.
सुवर्णा बेडेकर / शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2299185)
अभ्यागत कक्ष : 35