आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आयसीएमआर शाईन 2026 या उपक्रमाच्या माध्यमातून उलगडले वर्गखोल्यांबाहेरचे विज्ञानाचे जग
प्रविष्टि तिथि:
13 AUG 2026 5:53PM by PIB Mumbai
पुणे, 13 ऑगस्ट 2026
महाराष्ट्रात पुणे इथे 1 आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या शाईन अर्थात भावी संशोधकांसाठी विज्ञान आणि आरोग्य विषयक नवोन्मेष (S.H.I.N.E. - Science and Health Innovation for the NextGen Explorers) हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाचे हे दुसरे पर्व होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (ICMR-NIV - Indian Council of Medical Research - National Institute of Virology) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात तीन राज्यांच्या 50 शाळांमधील इयत्ता 9 वी ते 12 वीच्या 755 विद्यार्थ्यांसह 103 शिक्षक सहभागी झाले होते.

शाईन हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा एक महत्वाचा उपक्रम आहे. इयत्ता 9 वी ते 12 वीत शिकत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे आणि त्यांना जैववैद्यकीय संशोधनात कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी युवा प्रतिभेला भारतातील प्रमुख संशोधन संस्थांमध्ये आणून प्रत्यक्ष अनुभव देणे आणि त्यांचा शास्त्रज्ञांशी थेट संवाद घडवून आणण्याकरता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या पुण्यातील डॉ. आंबेडकर रस्ता आणि पाषाण या दोन्ही संकुलांमध्ये, तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या केरळमधील अलप्पुझा इथले क्षेत्रीय केंद्र आणि संस्थेच्या जम्मू इथल्या उत्तर क्षेत्रीय केंद्रात ओपन स्कूल डे उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी आभासी पद्धतीने संवाद साधला. शालेय विद्यार्थ्यांनी संशोधन संस्थेत एक दिवस शास्त्रज्ञ म्हणून घालवावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याची बाब त्यांनी नमूद केली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या संवादातून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित केले. विषाणूंचे विविध प्रकार, या संस्थेची कार्यकक्षा आणि विषाणू संशोधनाचे महत्व याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या उपक्रमाअंतर्गत शास्त्रज्ञांना भेटा या सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. या सत्रात विद्यार्थ्यांमधील उत्सुकतेचे रुपांतर थेट संवादात झाल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. या शास्रज्ञांना त्यांनी विज्ञान, विषाणू आणि आरोग्य संशोधनाबद्दलचे प्रश्न विचारले. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेना ग्रामीण भागातील शाळांपर्यंतचा संपर्कही अधिक भक्कम झाला. यासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या वर्गखोल्यांच्या पलीकडे जात विज्ञानाचा अनुभव घेण्याची संधीही उपलब्ध झाली.
या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक सादरीकरणे, आरोग्यविषयक संशोधनातील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या योगदानावरील चित्रफिती, पोस्टर विषयक सत्रे, विषाणू संशोधन प्रयोगशाळा आणि कीटकशास्त्र संग्रहालयाची पाहणी, तसेच वैयक्तिक संरक्षण विषयक उपकरणांचे (PPE - Personal Protective Equipment) थेट प्रात्यक्षिक आणि शास्त्रज्ञांसोबतच्या प्रश्नोत्तर सत्रांच्या माध्यमातून विषाणूशास्त्राचा विविधांगी अभ्यास साधला.

या कार्यक्रमादरम्यान देशभरातील शाळांसाठी एका स्पर्धेचीही घोषणा करण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्सुकतेचे रुपांतर संशोधनात्मक प्रश्नांमध्ये करण्याचे आणि सार्वजनिक आरोग्यासमोरील प्रत्यक्ष आव्हानांवर नवोन्मेषी उपाययोजना सुचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाईन 2026 या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था भावी पिढीतील संशोधकांना प्रश्न विचारण्यासाठी, नवोन्मेषाची कास धरण्यासाठी आणि विकसित भारताच्या जडणघडीत योगदान देण्याकरिता वैज्ञानिक भावना जपण्यासाठी सातत्याने प्रेरित करत आहे.
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299175)
आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English