माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सरकारच्या 12 वर्षांतील यशस्वी कामगिरींवर , व्हीबी- जी राम जी आणि ‘हर घर तिरंगा’ या विषयांवर आधारित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे भंडारा येथे उद्घाटन
गेल्या 12 वर्षांत परिवर्तनात्मक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करण्यासाठी अथक प्रयत्न केले गेले आहेत: भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार, भाप्रसे
Posted On:
13 AUG 2026 3:09PM by PIB Mumbai
नागपूर, 13 ऑगस्ट 2026
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या, नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे आयोजित तीन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आज भंडारा येथील बस स्थानकावर उद्घाटन झाले. 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात सरकारच्या 12 वर्षांच्या यशोगाथा, व्हीबी- जी राम जी उपक्रम आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानावर आधारित मल्टिमीडिया फलक, छायाचित्रे आणि नागरिक जनजागृती उपक्रमांचा समावेश आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन करताना भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार, भाप्रसे म्हणाले की, गेल्या 12 वर्षांत विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले आहेत. या योजनांचे फायदे अंतिम घटकापर्यंत पोहोचवून सर्वसमावेशक आणि समान विकास सुनिश्चित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कटिबद्ध आहे.
उपस्थितांचे स्वागत करताना सीबीसी क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे यांनी एकात्मिक संप्रेषण आणि आउटरीच उपक्रमाच्या उद्दिष्टांची माहिती दिली आणि नागरिकांना सरकारच्या विविध उपक्रमांची आणि कल्याणकारी योजनांची माहिती घेण्यासाठी या तीन दिवसीय प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले. या उद्घाटन प्रसंगी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रशांत पडगण आणि इतर जिल्हा अधिकारी उपस्थित होते.

सीबीसी च्या पीआरटी पथकाद्वारे सादर करण्यात आलेल्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमात सरकारच्या 12 वर्षांचे यश, व्हीबी- जी राम जी आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानावर आधारित सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्धी सहाय्यक शुभम गुडाधे यांनी आभार मानले.

या प्रदर्शनात जिल्हा प्रशासनातर्फे व्हीबी- जी राम जी , स्वयं सहाय्यता बचत गट आणि आरोग्य विभागाच्या उपक्रमांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. हे प्रदर्शन 15 ऑगस्टपर्यंत सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले राहील.
VMFG.jpeg)
पीआयबी मुंबई |नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
(Release ID: 2298862)
अभ्यागत कक्ष : 40