आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
‘आयसीएमआर – शाईन 2026’ : विज्ञान, आरोग्य आणि नवोन्मेषाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा
मुंबईमध्ये ‘आयसीएमआर – एनआयआरबीआयडी’ येथे 11 आणि 12 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय विज्ञान उपक्रमाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2026 9:20PM by PIB Mumbai
मुंबई, 12 ऑगस्ट 2026
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन ब्लड अँड इम्युन डिसऑर्डर्स (एनआयआरबीआयडी),अर्थात राष्ट्रीय रक्त आणि रोगप्रतिकारशक्ती विकार संशोधन संस्था येथे 11 आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी ‘आयसीएमआर – शाईन 2026’ : सायन्स अँड हेल्थ इनोव्हेशन फॉर द नेक्स्टजन एक्सप्लोरर्स) अर्थात पुढील पिढीतील संशोधकांसाठी विज्ञान आणि आरोग्य नवोन्मेष या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना देशाच्या जैववैद्यकीय संशोधन परिसंस्थेशी जोडणे, त्यांच्यात वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवोन्मेषाची भावना विकसित करणे, तसेच आरोग्य आणि वैद्यकीय शास्त्राविषयी सखोल समज निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या दोन दिवसांच्या कार्यक्रमामुळे इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना वर्गाच्या पलीकडे जाऊन जैववैद्यकीय संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची, तसेच वैज्ञानिक संशोधनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनातील आरोग्यविषयक आव्हानांवर कशा प्रकारे उपाय शोधले जातात, हे समजून घेण्याची संधी मिळाली.
या दोन दिवसांच्या कार्यक्रमात 89 मुले आणि 104 मुली मिळून एकूण 193 विद्यार्थी सहभागी झाले होते. 11 ऑगस्ट 2026 रोजी, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. 1, कुलाबा येथील 50 विद्यार्थी आणि आर. एम. भट विद्यालय, परळ मधील 57 विद्यार्थ्यांनी संस्थेला भेट दिली. 12 ऑगस्ट 2026 रोजी, आर. एम. भट विद्यालय, परळमधील आणखी 83 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले.
पारंपरिक वर्ग अध्यापनापेक्षा वेगळे असणाऱ्या ‘SHINE 2026’ ने विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्यास, प्रश्न विचारण्यास, उपक्रमांमध्ये भाग घेण्यास आणि वैज्ञानिक संकल्पनांचे व्यावहारिक उपयोजन समजून घेण्यास प्रोत्साहित केले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना जैववैद्यकीय संशोधन कशा प्रकारे केले जाते, अत्याधुनिक प्रयोगशाळेतील उपकरणांचा वापर कसा केला जातो, तसेच संशोधन प्रक्रियेमुळे विशेषतः दुर्मिळ रक्तविकार आणि रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित विकारांच्या जलद, प्रभावी आणि किफायतशीर निदान आणि उपचार पद्धती विकसित करण्यास कशी मदत होते, याची प्रत्यक्ष माहिती मिळाली.
या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना संस्थेतील शास्त्रज्ञ, तांत्रिक कर्मचारी आणि पीएचडी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. या संवादामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा पद्धती, वैज्ञानिक संकल्पना, संशोधन पद्धती आणि संशोधकांच्या दैनंदिन जीवनाबद्दल सखोल माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, उच्च शिक्षण, करिअरच्या संधी आणि जैववैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील कारकिर्दीशी जोडलेली आव्हाने आणि फायदे यांबद्दल प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
या कार्यक्रमात अनेक नवीन घटकांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशी संवाद, पीएचडी विद्यार्थ्यांशी चर्चा, उपकरणे आणि प्रयोगशाळेतील कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव, माहिती-मनोरंजन आधारित खेळ, एआय-सक्षम व्हिडिओ आणि कृतीशील- शिक्षण यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना संशोधन, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, रक्तविज्ञान, रोगप्रतिकारशास्त्र, सार्वजनिक आरोग्य, संसर्गरोगांचे शास्त्र, डेटा सायन्स, बायोइन्फॉर्मेटिक्स आणि प्रयोगशाळा विज्ञान यांसारख्या विविध करिअर मार्गांची ओळख करून देण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान, “विकसित भारत @2047 याअंतर्गत युवकांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा जागृत करणे” या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची घोषणाही करण्यात आली.
या कार्यक्रमाने लहान विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच प्रत्यक्ष वैज्ञानिक वातावरणाचा अनुभव देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रयोगशाळेतील प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून आणि कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांशी संवाद साधून, विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गातील शिक्षणाला वास्तविक जीवनातील उपयुक्ततेशी जोडता आले आणि निदान, उपचार आणि आरोग्यसेवेच्या प्रगतीमध्ये विज्ञान कसे योगदान देते, याची अधिक चांगली माहिती प्राप्त झाली.
अशाप्रकारे, आयसीएमआर- एनआयआरबीआयडी यांच्यावतीने येथे आयोजित ‘आयसीएमआर-शाइन 2026’ कार्यक्रमाने वर्गातील शिक्षण आणि समकालीन जैववैद्यकीय संशोधन यांमधील दरी सांधण्यासाठी एक अर्थपूर्ण व्यासपीठ म्हणून काम केले. या उपक्रमाद्वारे, आयसीएमआर- एनआयआरबीआयडी ने संशोधक, नवोन्मेषक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या पुढील पिढीचे संगोपन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.





* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2298677)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English