सहकार मंत्रालय
'बीबीएसएसएल'च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी दर्जेदार बियाण्याची उपलब्धता
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2026 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2026
सहकार मंत्रालयाने 'बहु-राज्य सहकारी संस्था कायदा, 2002' अंतर्गत 'भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड' (बीबीएसएसएल) ची स्थापना केली आहे. सहकार-नेतृत्वाखालील रचनेद्वारे एक मजबूत आणि शेतकरी-केंद्रित बियाणे प्रणाली उभारण्याच्या स्पष्ट उद्देशासह ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. दर्जेदार बियाण्यांचे उत्पादन, खरेदी, प्रक्रिया, ब्रँडिंग, लेबलिंग, पॅकेजिंग, साठवणूक, विपणन, वितरण आणि धोरणात्मक संशोधन व विकास यांसाठी ही एक सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करेल.
'भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड' ने आतापर्यंत देशभरात वितरणासाठी 'भारत बीज' या ब्रँडअंतर्गत 18 पिके आणि 124 वाणांची बियाणे बाजारात आणली आहेत. याव्यतिरिक्त, निर्धारित बियाणे गुणवत्ता आणि नियामक मानकांनुसार भाजीपाल्याच्या बियाण्यांचे उत्पादन तसेच गुणवत्ता-चाचणीविषयक आवश्यकता विकसित करण्यासाठी बीबीएसएसएल ने पुढाकार घेतला आहे.
आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये बीबीएसएसएल ने 'भारत बीज' ब्रँडच्या बीज उत्पादन कार्यक्रमांतर्गत, त्याच्याशी संलग्न बीज उत्पादक शेतकऱ्यांमार्फत 75,535 मेट्रिक टन बियाण्यांचे उत्पादन केले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांना संघटित बीज उत्पादनात सहभागी होण्यास मदत करतो आणि निर्धारित गुणवत्ता तसेच प्रमाणीकरण मानकांनुसार बियाणे उत्पादनासाठी तांत्रिक सहाय्य पुरवतो.
पारंपरिक देशी वाणांच्या संवर्धनासाठी, बीबीएसएसएल ने उत्तराखंडमध्ये एक कार्यक्रम सुरू केला आहे; ज्यामध्ये अशा वाणांची ओळख पटवणे, त्यांचे जतन तसेच संवर्धन करणे, त्यांची संख्या वाढवणे आणि त्यांची नोंदणी/दस्तऐवजीकरण करणे यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. बीबीएसएसएलच्या उपक्रमांमध्ये देशांतर्गत बियाणे उत्पादनाचा विस्तार, देशी अनुवांशिक संसाधनांचे जतन आणि सहकारी नेटवर्कद्वारे दर्जेदार बियाणांचे वितरण यांचा समावेश आहे. या माध्यमातून, देशाचे आयात बियाणांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या आणि बियाणे क्षेत्रात आत्मनिर्भरता मजबूत करण्याच्या उद्देशाला हातभार लागत आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2298606)
आगंतुक पटल : 14