भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'महासागर आणि ध्रुवीय विज्ञान व तंत्रज्ञान' यावरील ब्रिक्स कार्यगटाच्या 8व्या बैठकीला गोव्यात प्रारंभ


महासागर व ध्रुवीय विज्ञानातील सहकार्याबाबत ब्रिक्सच्या आठ देशांमधील शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांच्यात चर्चा

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2026 5:42PM by PIB Mumbai

गोवा, 12 ऑगस्‍ट 2026

 

भारताच्या  ब्रिक्स अध्यक्षपद 2026 चा एक भाग म्हणून, 'महासागर आणि ध्रुवीय विज्ञान आणि  तंत्रज्ञान' या  विषयावरील ब्रिक्स कार्यगटाची  8 वी बैठक 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च' (एनसीपीओआर) द्वारे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

12 ऑगस्ट रोजी या बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ॲट्रिया विद्यापीठाचे कुलगुरू आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. एम. राजीवन् यांच्यासह  पृथ्वी विज्ञान मंत्रालय अंतर्गत संस्थांचे संचालक व शास्त्रज्ञ, तसेच मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी तसेच ब्रिक्स सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एनसीपीओआरचे संचालक आणि 2026 साठीच्या  कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. थंबन मेलोथ यांनी सहभागींचे स्वागत केले. डॉ. राजीवन् यांचे "भारताचे नील अर्थव्यवस्था उपक्रम" या विषयावर बीजभाषण झाले.

या बैठकीच्या निमित्ताने भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती या देशांमधील  शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि अधिकारी सध्या सुरू असलेले राष्ट्रीय कार्यक्रम, सामायिक वैज्ञानिक हिताचे विषय आणि महासागर व ध्रुवीय विज्ञानांच्या क्षेत्रातील भविष्यातील सहकार्याच्या संधींवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सहभागी द्विपक्षीय, त्रिपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य, सामायिक हिताची प्राधान्यक्षेत्रे तसेच महासागर संशोधन आणि ध्रुवीय अभ्यासातील भविष्यातील उपक्रमांबाबतच्या प्रस्तावांवर चर्चा करत आहेत. तसेच, संयुक्त संशोधन, क्षमता बांधणी, वैज्ञानिक देवाणघेवाण आणि संशोधन पायाभूत सुविधांचा सामायिक वापर हे मुद्देही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

सदस्य देशांमध्ये वैज्ञानिक सहकार्य, ज्ञानाचे आदानप्रदान, क्षमता-बांधणी आणि संयुक्त संशोधनाला चालना देण्यासाठी 2018 मध्ये 'ब्रिक्स ओपीएसटी' (BRICS OPST) कार्यगटाची स्थापना करण्यात आली. या कार्यगटाच्या आतापर्यंत सात बैठका झाल्या आहेत; यापैकी तिसऱ्या बैठकीचे यजमानपद भारताने 2020 मध्ये आपल्या मागील 'ब्रिक्स' अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भूषवले होते.

भारताच्या 'ब्रिक्स' अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आयोजित या बैठकीमुळे 'ब्रिक्स' देशांमधील वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ होईल आणि लवचिकता, नवोन्मेष, शाश्वतता व वैज्ञानिक भागीदारी यांवर लक्ष केंद्रित करून महासागर व ध्रुवीय विज्ञानांच्या क्षेत्रातील प्रत्यक्ष सहकार्याला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 2298484) आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English