शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील युवकांना मिझोरमची संस्कृती अनुभवण्याची संधी; ‘युवा संगम’मध्ये सहभागी होण्याचे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा यांच्या कडून आवाहन

Posted On: 11 AUG 2026 12:06PM by PIB Mumbai

गोवा, 11 ऑगस्ट 2026  :

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) गोवाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ (EBSB) उपक्रमांतर्गत ‘युवा संगम फेज-7’ संवाद कार्यक्रमासाठी गोवा राज्यातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमांतर्गत युवकांना मिझोरमची संस्कृती, परंपरा आणि तेथील जीवनशैली जवळून जाणून घेण्याची आणि राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत ‘युवा संगम’साठी एनआयटी गोवा ही नोडल संस्था असून, या उपक्रमांतर्गत गोव्यातील युवकांचा सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरमसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील पात्र युवक-युवती सहभागी होऊ शकतात. या माध्यमातून सहभागी युवकांना मिझोरममधील शैक्षणिक संस्था, उद्योग, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, स्थानिक समुदाय तसेच विविध सांस्कृतिक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

‘युवा संगम’ हा देशाच्या विविध भागांतील युवकांना एकमेकांच्या जवळ आणणारा उपक्रम असून, याद्वारे सांस्कृतिक देवाणघेवाण, शैक्षणिक संवाद आणि सामाजिक सहभागाला चालना दिली जाते. विविध राज्यांतील युवकांमध्ये वैचारिक क्षमता, मैत्री आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

‘युवा संगम’ साठी इच्छुक विद्यार्थी आणि युवकांना 4 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत युवा संगम पोर्टल https://ebsb.aicte-india.org/ वर नोंदणी करता येणार आहे तसेच अधिक माहितीसाठी डॉ. शिवनारायण पाटीदार, नोडल अधिकारी, युवा संगम सेल, एनआयटी गोवा यांच्याशी प्रत्यक्ष अथवा 8329138521 या क्रमांकावर संपर्क साधावा.

मिझोरमची समृद्ध संस्कृती आणि वारसा जवळून अनुभवण्यासाठी आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या भावनेला बळकटी देण्यासाठी युवकांना सदर उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन एनआयटी गोवा कडून करण्यात येत आहे.

***

Source- NIT, Goa/PIB Panaji / Ambadas Yadav / DineshYadav

 

Follow us on Social Media:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 2297480) अभ्यागत कक्ष : 45
Read this releasein: English