विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुरग्रस्त आसाममध्ये पेयजलाची आपूर्ती करण्यासाठी सी एस आय आर -नीरी ने स्वदेशी नीरी झार वॉटर फिल्टर सुपूर्द केले

Posted On: 10 AUG 2026 6:51PM by PIB Mumbai

नागपूर, 10 ऑगस्ट 2026

आसाममधल्या पूरग्रस्तांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करण्याच्या उद्देशाने एका महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (सी एस आय आर - नीरी) आपले स्वदेशी 'नीरी-झार इन्स्टंट वॉटर फिल्टर्स' तैनात केले आहेत. पुरामुळे ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली  आहे किंवा दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा भागांमध्ये  पिण्याचे सुरक्षित पाणी तात्काळ उपलब्ध करणे हा यामागील उद्देश आहे.

जोरहाट जिल्ह्यातील जोनाकिमोंडल गावात आपत्कालीन जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि त्याचे वितरण करण्यात आले. पूरस्थिती तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये बाधित कुटुंबांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या जलस्रोतांपासून पिण्यायोग्य पाणी तयार करता यावे, यासाठी पाच घरगुती वापरासाठी आणि पाच सामुदायिक वापरासाठी अशा एकूण दहा नीरी झार युनिट्सची स्थापना करण्यात आली.
 
मदतकार्याचा विस्तार करण्यासाठी, पूरग्रस्त समुदायांमध्ये वितरण करण्याकरिता 70 घरगुती वापरासाठी आणि 20 सामुदायिक वापरासाठी अशा एकूण 90 नीरी झार युनिट्स जोरहाट जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत . या युनिट्सचे औपचारिक हस्तांतरण सी एस आय आर-नीरी चे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन आणि सी एस आय आर-नॉर्थ ईस्ट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जोरहाटचे संचालक डॉ. व्ही. एम. तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.

हे तंत्रज्ञान परिस्थितीनुरूप वापरता येण्याइतपत लवचिक असून आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात सक्षम असल्याने सी एस आय आर-नॉर्थ ईस्ट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जोरहाट येथे स्थानिक पातळीवर सर्व नीरी -झार युनिट्सची जुळणी उपलब्ध साहित्याचा वापर करून अवघ्या दोन दिवसांत करण्यात आली. त्यामुळे पूरग्रस्त भागात ही युनिट्स तातडीने कार्यान्वित करणे शक्य झाले.

सी एस आय आर - नीरी द्वारे विकसित करण्यात आलेले नीरी -झार  हे स्वदेशी आपत्कालीन जलशुद्धीकरण तंत्रज्ञान असून, पूर, चक्रीवादळे आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या काळात सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान विशेषतः पूरप्रवण भागांसाठी उपयुक्त आहे, कारण अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत अनेकदा दूषित होतात आणि त्यामुळे पारंपरिक जलशुद्धीकरण सुविधांमधून येणारे पाणी दूषित होण्याचा धोका अधिक असतो.

या तंत्रज्ञानाचे अनेक लाभ असून त्यासाठी विजेची आवश्यकता नाही तसेच ते जलद आणि सोप्या पद्धतीने लावणे शक्य होते, याशिवाय हे युनिट घरगुती आणि सामुदायिक अशा दोन्ही ठिकाणी वापरण्यायोग्य असून स्थानिक स्रोतांमधून येणाऱ्या दूषित पाण्यावर प्रभावी प्रक्रिया करण्यासाठी सक्षम आहे.  

नीरी-झार युनिट्स  हे आसामच्या पूरप्रवण भागांमध्ये सामुदायिक लवचिकता आणि आपत्कालीन जलसुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. नैसर्गिक आपत्तींच्या काळात निर्माण होणारी  पिण्याच्या पाण्याची  गंभीर गरज पूर्ण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान, वैज्ञानिक नवोन्मेष आणि विविध संस्थांमधील सहकार्याची महत्त्वपूर्ण भूमिका या उपक्रमातून अधोरेखित होते.

 पीआयबी मुंबई |निलीमा चितळे/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2297304) अभ्यागत कक्ष : 48
Read this releasein: English