अर्थ मंत्रालय
डीजीटीएस मुंबई आणि सीआयआय यांनी 'भारताच्या व्यापारावर भूराजकीय घडामोडींचा परिणाम'या विषयावरील चर्चासत्राचे केले आयोजन
Posted On:
07 AUG 2026 6:41PM by PIB Mumbai
मुंबई,7 ऑगस्ट 2026
करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस) मुंबई विभागीय कक्षाने सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या पश्चिम क्षेत्राच्या सहयोगाने 7 ऑगस्ट 2026 रोजी 'भारताच्या व्यापारावर भूराजकीय घडामोडींचा परिणाम' या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन केले. जागतिक भू-राजकीय घडामोडींचा, व्यापार, पुरवठा साखळ्या आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायावर होणाऱ्या परिणामांबाबत निर्यातदार, आयातदार, उद्योग प्रतिनिधी, व्यावसायिक, उद्योजक आणि इतर संबंधित घटकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
सीआयआय पश्चिम क्षेत्र आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक उपसमितीचे सह-अध्यक्ष आणि पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या जागतिक निर्यात आणि नवे व्यवसाय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग अग्रवाल यांच्या स्वागतपर प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बदलत्या जागतिक व्यापार वातावरणात व्यवसाय करणाऱ्यांनी माहितीपूर्ण असण्याची आणि तसेच परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता अंगी बाणवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

डीजीटीएस मुंबई विभागीय कक्षाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनीही उपस्थितांना संबोधित केले. भू-राजकीय घडामोडी, शुल्क, निर्बंध आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय जागतिक व्यापाराला नव्याने आकार देत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. व्यवसायांनी भूराजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे, बाजारपेठांमधील वैविध्य आणि बदलत्या व्यापार नियमांचे अनुपालन सुनिश्चित करून आपली लवचिकता बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या एकात्मिक सीमाशुल्क प्रणाली, ई-बॉन्ड, इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी आणि फेसलेस असेसमेंट यांसारख्या व्यापार सुलभता सुधारणांकडे त्यांनी लक्ष वेधले. सुधारित व्यवसाय सुलभतेवरही त्यांनी प्रकाश टाकला.
नुकॉव फॅसिली-ट्रेडचे मुख्य सल्लागार आणि सीआयआय राष्ट्रीय कर आकारणी समितीचे सदस्य डॉ. जोशुआ एबेनेझर यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात भू-राजकारणाच्या वाढत्या भूमिकेवर भाष्य केले. त्यांनी व्यवसायांना वाढत्या अनुपालनासाठी, पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी आणि उदयास येणाऱ्या जागतिक संधींचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेचे वरिष्ठ फेलो उत्तम सिन्हा यांनी दुसऱ्या तांत्रिक सत्रात मार्गदर्शन केले. त्यांनी भू-अर्थशास्त्राचे वाढते महत्त्व, प्रमुख अर्थव्यवस्थांमधील धोरणात्मक स्पर्धा आणि भारताने आपली धोरणात्मक स्वायत्तता जपत धोरणात्मक लवचिकता निर्माण करण्याची गरज विशद केली.
या चर्चासत्रात देशभरातील निर्यातदार, आयातदार, व्यापार संघटना, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, व्यावसायिक आणि सीबीआयसी अधिकारी यांनी सक्रिय भाग घेतला. परस्पर संवादावर आधारित चर्चांमुळे सहभागींना जागतिक व्यापारातील उदयोन्मुख आव्हाने आणि संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे शक्य झाले. डीजीटीएस मुंबई विभागीय कक्षाद्वारे एप्रिल 2026 पासून आयोजित करण्यात आलेला हा 27 वा संपर्क व जनजागृती उपक्रम होता. यातून डीजीटीएसची संबंधित भागधारकांशी संवाद, करदात्यांमध्ये जागरूकता आणि व्यापार सुलभतेला प्रोत्साहन देण्याबाबतची दृढ वचनबद्धता पुन्हा एकदा दिसून आली.
माधुरी पांगे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296264)
अभ्यागत कक्ष : 30