वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर इथले विणकर सेवा केंद्र 7 ऑगस्ट रोजी 12 वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करणार

Posted On: 06 AUG 2026 4:02PM by PIB Mumbai

नागपूर, 6 ऑगस्ट 2026

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हातमाग विकास आयुक्त कार्यालयांतर्गत असलेले नागपूर इथले विणकर सेवा केंद्र 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून वरोडा इथल्या धापेवाडा-कळमेश्वर राष्ट्रीय महामार्गाजवळ, कळमेश्वर इथे असलेल्या 'धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड'च्या सामायिक कारखान्यात 12 वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहे.

1905 च्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस पाळला जातो. या चळवळीने स्वदेशी उत्पादनांचा वापर आणि स्वावलंबनाच्या भावनेला चालना दिली होती.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राजीव भास्करराव पोतदार, माजी उपविभागीय दंडाधिकारी आणि धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे संचालक सुधीर दिवे, नागपूरच्या गांधी हँडलूमच्या मालक निधी गांधी आणि धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या संचालिका राजश्री बापट उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक (विणकाम) संदीप पी. ठुबरीकर आणि सहाय्यक संचालक (विणकाम) एम. व्ही. पौनीकर हेही उपस्थित राहणार आहेत .

या सोहळ्यात 300 हून अधिक हातमाग विणकर, उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर भागधारक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमात हातमाग क्षेत्रासाठीच्या प्रमुख सरकारी उपक्रमांविषयी जागरूकता सत्रे आयोजित केली जातील, त्यामध्ये हातमाग संवर्धन सहायता, सामाईक कार्यक्षेत्र योजना, डिझाईन विकास, गटविकास, विपणन उपक्रम, प्रधानमंत्री मुद्रा योजना, इंडिया हँडलूम ब्रँड आणि विणकरांसाठी उपलब्ध असलेल्या इतर सहाय्य सेवांचा समावेश असेल.

भारताचा समृद्ध हातमाग वारसा दर्शविणाऱ्या हातमाग उत्पादने, पारंपारिक वस्त्रे, डिझाईनचे नमुने आणि प्रचारात्मक साहित्याचे प्रदर्शनही याप्रसंगी आयोजित केले जाणार आहे. पारंपारिक करवत काठी विणकाम तंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक हे या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असेल.

या प्रसंगी हातमाग क्षेत्रातल्या योगदानाबद्दल उत्कृष्ट विणकर आणि कारागिरांचा सत्कार करण्यात येईल. कच्चा माल पुरवठा योजना आणि इतर सहाय्यक उपक्रमांतर्गत विविध विकासात्मक सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांचाही यावेळी सन्मान केला जाईल. यात हातमाग, कारखाना, सौर प्रकाश आणि कौशल्य विकासासाठी दिलेल्या मदतीचा समावेश आहे.


पीआयबी मुंबई |सुषमा काणे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2295485) अभ्यागत कक्ष : 40
Read this releasein: English