दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भारतातील पहिल्या दूरसंचार उत्पादन क्षेत्रासाठी 5,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ग्वाही मिळवली
मुंबई गुंतवणूकदारांच्या बैठकीने 2,000 कोटी रुपयांच्या नव्या गुंतवणुकीची आश्वासने मिळवली; दूरसंचार उत्पादन क्षेत्रातून 18,000 पेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण होणार
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत, जागतिक दर्जाच्या, सर्वोत्तम श्रेणीच्या उत्पादन परिसंस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे: केंद्रीय मंत्री सिंधिया
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2026 9:53PM by PIB Mumbai
मुंबई, 4 ऑगस्ट 2026
केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी आज मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्यासह मुंबईमध्ये गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. ग्वाल्हेर येथे उभारण्यात येणाऱ्या, भारतातील पहिल्या आणि एकमेव दूरसंचार उत्पादन क्षेत्रासाठी (टीएमझेड) गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत 2,000 कोटी रुपयांच्या नव्या गुंतवणुकीची आश्वासने मिळवण्यात केंद्रीय मंत्री सिंधिया आणि मुख्यमंत्री यादव यांना यश आले. दूरसंचार परिसंस्थेतील आघाडीचे सुमारे 18 उद्योग या बैठकीत सहभागी झाले होते. आज मिळवलेल्या गुंतवणुकीच्या ग्वाहीमुळे सुमारे 4,000 रोजगार संधींची निर्मिती होईल.

मुंबईतील बैठकीत मिळालेल्या आश्वासनांसह, दूरसंचार उत्पादन क्षेत्राने आता एकंदर 5,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली असून या क्षेत्रामुळे 18,000 पेक्षा अधिक रोजगार संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे पार पडलेल्या उद्घाटनपर गुंतवणूकदार गोलमेज बैठकीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या 3,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आश्वासने आणि 14,000 नोकऱ्यांच्या निर्मितीची अपेक्षा व्यक्त झाल्यानंतर आज टीएमझेडच्या 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक मिळवण्याच्या संकल्पाची पूर्तता होण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

उद्योग क्षेत्रातील धुरीणांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात गेल्या बारा वर्षांमध्ये दूरसंचार आणि डिजिटलीकरण या क्षेत्रांमध्ये परिवर्तनकारी क्रांती घडून आली आहे. दूरसंचार सेवांद्वारे संचालित देश ते दूरसंचार उत्पादने आणि निर्मितीच्या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व होण्यासाठी सज्ज देश, असा भारताचा विकास झाला आहे.
“मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” तसेच “लोकल फॉर ग्लोबल” या संकल्पनांवर अधिक भर देत केंद्रीय मंत्री म्हणाले की भारताने आता सेवांच्या आधारावर चालणाऱ्या देशाकडून उत्पादनांच्या आधारावर चालणाऱ्या देशाकडे स्थित्यंतर घडवले पाहिजे. हे परिवर्तन घडून येण्यासाठी त्यांनी पुढील त्रिसूत्री मांडली: देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवणे, भारतात बौद्धिक संपदा निर्माण करणे तसेच भारतात रचना झालेली आणि भारतात उत्पादित दूरसंचार उत्पादने जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचणे शक्य करणे.

मोबाईल फोन्सचे उत्पादन तसेच डिजिटल सार्वजनिक सुविधांच्या क्षेत्रात भारताने मिळवलेल्या उल्लेखनीय यशानंतर आता दूरसंचार उत्पादन क्षेत्रात हेच मॉडेल राबवता येईल, असे केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सांगितले. मोबाईल फोन्सच्या प्रचंड प्रमाणातील आयातीकडून, जगातील एक मोठा मोबाईल उत्पादक देश होण्यापर्यंत भारताने परिवर्तन करून दाखवले आहे, असे नमूद करत ते म्हणाले की युपीआय सारख्या डिजिटल मंचांनी जागतिक पातळीवर विस्तारता येण्याजोगी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना निर्माण करण्याची भारताची क्षमता दाखवून दिली आहे. ग्वाल्हेरमधील टीएमझेड देखील अशीच एक वैश्विक यशोगाथा निर्माण करेल, जिचा कित्ता जगभरातील देशांना गिरवावासा वाटेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी यावेळी व्यक्त केला.
'विशेष आर्थिक क्षेत्रांच्या' (SEZ) यशातून प्रेरणा घेऊन केवळ दूरसंचार क्षेत्रासाठीच तयार करण्यात आलेला अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम' अशा शब्दांत, मंत्रीमहोदयांनी 'टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन'चे वर्णन केले. या एकात्मिक परिसंस्थेअंतर्गत रचना, संशोधन आणि विकास, चाचणी, उत्पादन, उपकरणाचे भाग, सेमीकंडक्टर्स (अर्धवाहक), ऑप्टिकल फायबर, दूरसंवाद उपकरणे आणि संबंधित उद्योगांसह संपूर्ण दूरसंवाद मूल्यसाखळी एकाच छताखाली येईल, असे ते म्हणाले. या संपूर्ण व्यवस्थेला परस्पर सामायिक वापरासाठी सज्ज असलेल्या चाचणी विषयक पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाच्या सुविधांचे पाठबळ असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या उपक्रमासाठी ग्वाल्हेरचे धोरणात्मक महत्व देखील त्यांनी अधोरेखीत केले. हा उपक्रम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, यासाठी उत्तम दळणवळण-जोडणीची सुविधा असणार आहे. येथे पूर्वीपासूनच प्रस्थापित असलेली औद्योगिक परिसंस्था आहे, वापरासाठी सज्ज असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, इथल्या प्रख्यात शैक्षणिक संस्थांमधून प्रतिभावान मनुष्यबळाचा सातत्यपूर्ण पुरवठा उपलब्ध असणार आहे, तसेच इथे कार्यान्वयनासाठीच्या खर्चात स्पर्धात्मकता आहे, यामुळे ग्वाल्हेर हे दूरसंवाद उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठीचे एक आदर्श ठिकाण म्हणून विकसित होऊ लागले असल्याचे ते म्हणाले. यानिमित्ताने सिंधिया यांनी ग्वाल्हेरमध्ये वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांबाबतची माहितीही दिली. इथल्या विस्तारत असलेल्या दळणवळण जोडणीमुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने या शहराचे मूल्य लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी अति वेगवान आग्रा - ग्वाल्हेर हरीत द्रुतगती मार्ग आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासोबतची महामार्गांद्वारे सुधारलेली दळणवळण जोडणी यामुळे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि ग्वाल्हेरमधील प्रवास 3 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण होईल असे ते म्हणाले.
दूरसंवाद क्षेत्राच्या प्रत्येक पैलुशी संबंधित असलेल्या कंपन्यांनी या भागात आपले केंद्र सुरु करावे, आणि सुरुवातीच्या टप्प्यापासून ते अखेरच्या टप्प्यापर्यंतची सर्व प्रक्रिया करणारी एक परीपूर्ण उत्पादन परिसंस्था निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि मध्य प्रदेश राज्य सरकारने हा दूरसंवाद उत्पादन विभाग प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्रीय भागिदारांच्या स्वरुपात दिलेल्या योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांचे कौतुकही केले. जमिनीची उपलब्धता, भांडवली पाठबळ, रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना, कौशल्य विकासासाठीचे सहाय्य आणि रसद पुरवठा व्यवस्थापन अशा सगळ्याच बाबतीत मध्य प्रदेश राज्य सरकारचे धोरण उद्योगस्नेही प्रोत्साहनाचे होते, ही बाब त्यांनी नमूद केली. अशा सर्व पुढाकारांमुळे या प्रकल्पाला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक उपक्रमाचे स्वरुप आले आहे, असे त्यांनी सांगितले.
या क्षेत्रासाठी केंद्र सरकार कायमच वचनबद्ध असणार असल्याची ग्वाही त्यांनी पुन्हा एकदा दिली. दूरसंवाद विभाग आणि मध्य प्रदेश राज्य सरकार या दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या एका स्पेशल पर्पज व्हेहिकलच्या माध्यमातून संयुक्तपणे या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या उपक्रमासाठी केंद्र आणि राज्य सरकारदरम्यान स्थापित झालेली ही भागिदारी अभूतपूर्व होती असे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक समस्येचे निवारण करण्यासाठी, गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि दूरसंवाद उत्पादन विभागाचे दीर्घकालीन यश सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे आणि सातत्यपूर्णतेने काम करत राहतील अशी ग्वाही त्यांनी गुंतवणुकदारांना दिली.
या गुंतवणूकदार परिषदेला दूरसंवाद विभागाचे सचिव अमित अग्रवाल, मध्य प्रदेश राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव नीरज मंडलोई, वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते आणि संपूर्ण दूरसंवाद परिसंस्थेतील गुंतवणूकदार उपस्थित होते.
माधुरी पांगे/संजना चिटणीस/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294647)
आगंतुक पटल : 8