अर्थ मंत्रालय
करदाता सेवा महासंचालनालयाच्या मुंबई प्रदेश कार्यालयातर्फे आयआयटी पवई येथील केंद्रीय विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वस्तू आणि सेवा कर विषयक जागरुकता चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
04 AUG 2026 7:28PM by PIB Mumbai
मुंबई, 4 ऑगस्ट 2026
शालेय विद्यार्थ्यांमध्ये कर साक्षरतेला चालना देण्याच्या तसेच त्यांच्यामध्ये वस्तू आणि सेवा कराविषयी (जीएसटी) जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, करदाता सेवा महासंचालनालयाच्या (डीजीटीएस) मुंबई प्रदेश कार्यालयातर्फे आयआयटी पवई येथील केंद्रीय विद्यालयात “जीएसटीच्या मूलभूत तत्वांविषयीची माहिती” या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. राष्ट्र उभारणी, आर्थिक विकास आणि जबाबदार नागरिकत्व यामध्ये करप्रणालीचे महत्त्व समजून घेण्यात विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश होता.
विद्यार्थ्यांमध्ये करप्रणालीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी देऊ करत असलेल्या अविरत पाठींब्याबद्दल मुंबई प्रदेश केंद्रीय विद्यालय संस्थेचे (केव्हीएस) उपायुक्त बी.के.बेहरा; मुंबई प्रदेश केव्हीएसचे सहाय्यक आयुक्त सुमित मेहरा; आयआयटी पवई येथील केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य विनोद वानखेडे यांच्या सत्कार समारंभाने सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली. जीएसटी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धा, पोस्टर बनवणे तसेच घोषवाक्य लिहिणे स्पर्धा यांसारख्या सर्व स्पर्धांचे विजेते तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे तसेच जीएसटी जागरुकता पुस्तकांचे देखील वितरण करण्यात आले. सीबीआयसीद्वारे जारी करण्यात आलेल्या जीएसटी दिन जनजागृती व्हिडीओचे या कार्यक्रमादरम्यान सादरीकरण करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, डिजीटीएसच्या मुंबई प्रदेश कार्यालयाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी जीएसटीला एक महत्त्वाची आर्थिक सुधारणा म्हणून अधोरेखित केले आणि सार्वजनिक कल्याण तसेच राष्ट्रीय विकासात कर कशा प्रकारे योगदान देतात हे समजावून सांगितले. व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून करप्रणाली शिकून घेण्यासाठी तसेच करप्रणाली आणि सार्वजनिक प्रशासन या क्षेत्रांतील कारकीर्दीच्या संधींचा शोध घेण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
बी.के.बेहरा यांनी या कार्यक्रमात बोलताना लहान वयात करविषयक जागरुकता मिळवण्याच्या महत्त्वावर अधिक भर दिला आणि शैक्षणिक तसेच करदाता जागरुकता कार्यक्रमांना चालना देण्यात केंद्रीय विद्यालय संस्था आणि डिजीटीएस यांच्या दरम्यान सातत्याने दिसून आलेल्या सहकार्याची प्रशंसा केली.
डिजीटीएसच्या मुंबई प्रदेश कार्यालयाचे संयुक्त संचालक डॉ.चंद्रकांत व्ही. केदार यांनी या कार्यक्रमातील तांत्रिक सत्र संचालित केले. यावेळी त्यांनी दैनंदिन जीवनातील सोप्या उदाहरणांचा वापर करत आंतरसंवादात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून जीएसटीची उद्दिष्टे, लाभ, जीएसटी दर, इनपुट टॅक्स क्रेडीट आणि करदात्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांसह जीएसटीची मूलभूत तत्वे विषद केली. संपर्क कार्यक्रमांच्या माध्यमातून करदात्यांचे शिक्षण आणि करासंदर्भात स्वयंस्फूर्त नियमपालन आणखी बळकट करण्याप्रती डिजीटीएसच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेचे दर्शन घडवत या चर्चासत्रात विद्यार्थी तसेच शिक्षकांचा उत्साही सहभाग दिसून आला.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2294540)
अभ्यागत कक्ष : 26