शिक्षण मंत्रालय
अखिल भारतीय शिक्षा समागम 2026 अंतर्गत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे "शिक्षण आणि मूल्य जाणीव" या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले
Posted On:
04 AUG 2026 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2026
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय (एमजीएएचव्ही), वर्धा येथील गांधी आणि शांतता अभ्यास विभाग यांनी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या अंमलबजावणीची सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित 'अखिल भारतीय शिक्षा समागम 2026' अंतर्गत "शिक्षण आणि मूल्य-जाणीव" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ने उच्च शिक्षणाला अधिक समावेशक, बहुशाखीय आणि विद्यार्थी-केंद्रित बनवून त्यात महत्त्वपूर्ण गुणात्मक आणि संरचनात्मक सुधारणा आणल्या आहेत, असे सेवाग्रामच्या आनंद निकेतन शाळेच्या संचालक सुषमा शर्मा यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि सामाजिक जबाबदारीची भावना जोपासण्यासाठी, अनुभवजन्य शिक्षण, प्रकल्प-आधारित शिक्षण आणि समुदाय सहभाग यासारखे घटक महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय ज्ञान प्रणाली, बहुभाषिक शिक्षण, पर्यावरण जागरूकता, शाश्वत विकास आणि नावीन्यपूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सुषमा शर्मा म्हणाल्या की, उच्च शिक्षण संस्थांनी स्थानिक समुदायाच्या गरजा आणि राष्ट्रीय विकासाची उद्दिष्टे यांच्यातील दुवा म्हणून काम केले पाहिजे. संवादात्मक सत्रादरम्यान, सहभागींनी बहुशाखीय शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष, उद्योग-शिक्षण तज्ञ सहकार्य, कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवणे, या मुद्द्यांवर चर्चा केली.
गांधी आणि शांतता अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. राकेश कुमार मिश्रा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की, शिक्षणाने केवळ ज्ञानच देऊ नये, तर राष्ट्रनिर्मितीसाठी वचनबद्ध असे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी नैतिक मूल्ये, शिस्त, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावनाही रुजवली पाहिजे.
माजी विभागप्रमुख प्रा. मनोज कुमार राय यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2294402)
अभ्यागत कक्ष : 40