WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मुंबईत 'ब्रिक्स वेव्हज बाजार' मध्ये एकत्र येणार ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांतील 500 हून अधिक प्रतिनिधी

 प्रविष्टि तिथि: 02 AUG 2026 6:07PM |   Location: PIB Mumbai

 

मुंबई, 2 ऑगस्ट 2026

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेले राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) 6 आणि 7 ऑगस्ट 2026 दरम्यान मुंबईत 'ब्रिक्स वेव्हज बाजार'चे आयोजन करणार आहे. सृजनशील अर्थव्यवस्थेसाठी (क्रिएटिव्ह इकॉनॉमी) एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून संकल्पित केलेल्या या बाजारात, ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधील 500 हून अधिक प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. यामध्ये भारत, तसेच इतर देशांतील सरकारे, उद्योग संस्था, आशय-निर्माते (क्रिएटर्स), चित्रपट निर्माते, गुंतवणूकदार, प्रसारक, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, सांस्कृतिक संस्था आणि विविध सर्जनशील उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवरांचा समावेश असेल.

ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करणे हा 'ब्रिक्स वेव्हज बाजार'चा मुख्य उद्देश आहे. यासाठी श्राव्य-दृश्य आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये संवाद साधण्यास, नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यास, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यास आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी उभारण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.

 

"भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली, आम्ही 'ब्रिक्स'ला एका नव्या रूपात परिभाषित करण्यासाठी कार्य करू. येथे ब्रिक्सचा अर्थ सहकार्य आणि शाश्वततेसाठी लवचिकता व नाविन्यतेची उभारणी  असा असेल. ज्याप्रमाणे आम्ही आपल्या जी-20 च्या अध्यक्षतेदरम्यान 'ग्लोबल साऊथ'च्या मुद्द्यांना विषयपत्रिकेत प्राधान्य दिले, त्याचप्रमाणे ब्रिक्सच्या अध्यक्षतेदरम्यानही आम्ही लोककल्याण आणि मानवतेला सर्वोच्च प्राधान्य देत या मंचाला पुढे घेऊन जाऊ," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद आले तेव्हा सांगितले होते.

याच दृष्टिकोनाला अनुसरून, हा सोहळा सहभागी देशांमध्ये नवोन्मेष, गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासोबतच 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी'मध्ये अधिक सखोल सहकार्य वाढवण्यासाठी कार्यरत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बाजारात उच्चस्तरीय परिषदा, मुख्य भाषणे, चर्चासत्रे, व्यावसायिक नेटवर्किंग सत्रे आणि विशेष आयोजित 'बिझनेस-टू-बिझनेस' बैठका असा व्यापक कार्यक्रम असेल.

 

या परिषदेत सृजनशील अर्थव्यवस्थेच्या भविष्याला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय सह-निर्मिती, आशय निर्मितीसाठी वित्तपुरवठा, डिजिटल परिवर्तन, बौद्धिक संपदा हक्क, महिला नेतृत्वाखालील उद्योजकता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, सार्वजनिक धोरणे आणि ग्लोबल साऊथ सदस्य देशांमधील सहकार्य या विषयांचा समावेश असेल.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे क्रिएटर्स हब हे प्रदर्शन दालन असेल. या दालनात सर्जनशील उद्योग, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान सेवा प्रदाते, स्टुडिओ, सेवा कंपन्या आणि उद्योग क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनातील स्टॉल्स आणि उत्पादन सादरीकरणांच्या माध्यमातून प्रतिनिधींना नवोन्मेषी उपाययोजना जाणून घेण्याची, नव्या व्यावसायिक संधींचा शोध घेण्याची आणि सर्जनशील मूल्यसाखळीतील आंतरराष्ट्रीय भागीदारी विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

यासोबतच, विशेष रुपाने आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस-टू-बिझनेस (बी-टू-बी) बैठका; निर्माते, स्टुडिओ, प्रसारण संस्था, ओटीटी व्यासपीठ,  स्टार्टअप्स,  गुंतवणूकदार,  खरेदीदार,  वितरक,  शासकीय संस्था आणि सर्जनशील उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना एकत्र आणतील. या बैठकीत सह-निर्मिती, आशय संपादन, तंत्रज्ञान भागीदारी, बाजारपेठेची उपलब्धता, गुंतवणूक आणि इतर सहकार्याच्या संधींवर चर्चा होऊन सहभागी देशांमधील व्यावसायिक आणि संस्थात्मक संबंध अधिक दृढ होतील.

ब्रिक्स वेव्हज् बाजार हा, सृजनशील अर्थव्यवस्थेला नवोन्मेष, उद्योजकता, रोजगार आणि आर्थिक विकासाचा प्रमुख चालक म्हणून स्थापित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून, हा बाजार ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमध्ये दीर्घकालीन भागीदारीला चालना देण्याचा तसेच व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो.

या कार्यक्रमात शासकीय संस्था, चित्रपट आयोग, निर्मिती कंपन्या, प्रसारण संस्था, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स, तंत्रज्ञान कंपन्या, सांस्कृतिक संस्था, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, सृजनशील नवउद्योजक आणि आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे संमेलन ब्रिक्सच्या आराखड्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सृजनशील अर्थव्यवस्थेवरील सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय संमेलनांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


रिलीज़ आईडी: 2293513   |   Visitor Counter: 9

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English