सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपुरात 33 वा डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सव दिमाखात संपन्न

Posted On: 01 AUG 2026 4:29PM by PIB Mumbai


नागपूर, 1 ऑगस्ट 2026

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्यातर्फे 29 ते 31 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 33 व्या 'डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाची' सांगता शुक्रवारी मोठ्या दिमाखात  झाली. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आयोजित या तीन दिवसीय महोत्सवाला संगीतप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून तिन्ही दिवस रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पद्मश्री पं. रोणू मजुमदार यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बासरीवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी आपल्या वादनाची सुरुवात 'राग रामदासी मल्हार'ने केली आणि त्यानंतर 'राग सूर मल्हार', मराठी नाट्यसंगीत व पारंपरिक रचना सादर करत 'माझे माहेर पंढरी' या लोकप्रिय मराठी अभंगाने आपल्या सादरीकरणाची सांगता केली. त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी, पखवाजवर ओंकार दळवी आणि बासरीवर कल्पेश सचला यांनी सुरेल साथसंगत केली.

दुसऱ्या सत्रात प्रख्यात गायक आणि संगीतकार डॉ. भरत बलवल्ली यांचे बहारदार हिंदुस्तानी शास्त्रीय गायन झाले. आपल्या गायनात त्यांनी 'राग दुर्गा' आणि 'राग झिंझोटी' मधील रचना, स्वतः स्वरबद्ध केलेले एक भक्तीगीत, तसेच महान संगीतसाधक मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना संगीतमय आदरांजली अर्पण केली. त्यांनी 'भैरवी'तील भावपूर्ण सादरीकरणाने आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना संवादिनीवर (हार्मोनिअम) मकरंद कुंदले, तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर आणि पखवाजवर डॉ. दादा परब यांनी सुरेल साथसंगत केली.

या कार्यक्रमादरम्यान दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक मिथिला तळवणेकर यांनी सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी आणि माजी कार्यक्रम अधिकारी शशांक दांडे यांचा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातील प्रदीर्घ योगदानाबद्दल शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर, उपसंचालक मिथिला तळवणेकर, सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्राच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2293023) अभ्यागत कक्ष : 38
Read this releasein: English