ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोतर्फे नवी मुंबईत शोध आणि जप्ती मोहीम; अवैध बीआयएस नोंदणी चिन्हे असलेली उत्पादने जप्त
Posted On:
31 JUL 2026 4:04PM by PIB Mumbai
भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) मुंबई शाखा कार्यालयाने काल, दिनांक 30 जुलै 2026 रोजी नवी मुंबईमध्ये वाशी रेल्वे स्थानकावरील मे.वोन एन्टरप्रायझेस/व्हीएचएच कम्युनिकेशन या दुकानावर छापा घालून शोध आणि जप्ती मोहीम राबवली. बीआयएस मानक चिन्हाचा दुरुपयोग रोखण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ब्युरोतर्फे सध्या हाती घेण्यात येत असलेल्या अंमलबजावणी उपक्रमांचा एक भाग म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली.
या कारवाईदरम्यान, बीआयएस अधिकाऱ्यांनी रिअलमी आणि एमआय या ब्रँडच्या पॉवरबँक्स, लुनो ब्रँडचे वायरलेस हेडसेट्स, बोट आणि रिअलमी ब्रँडचे इयरबड्स यांच्यासह 12 इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली.या उत्पादनांवर अवैध बीआयएस नोंदणी क्रमांक नोंदवले आहेत असे आढळून आले आणि त्यामुळे भारतीय मानक ब्युरो कायदा, 2016 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या तपासणीदरम्यान असे दिसून आले की, एका उत्पादनावर नोंदवलेला नोंदणी क्रमांक प्रत्यक्षात दुसऱ्याच उत्पादनाला देण्यात आलेला क्रमांक होता तर काही उत्पादनांचे उपप्रकार संबंधित बीआयएस नोंदणीच्या कक्षेबाहेर असल्याचे आढळून आले. अवैध बीआयएस नोंदणी चिन्हे असणाऱ्या पॉवरबँक्स, वायरलेस हेडसेट्स तसेच इयरबड्स यांची साठवणूक करुन संबंधित कंपनी ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देत होती आणि हे भारतीय मानक ब्युरो कायदा, 2016 च्या कलम 17 चे उल्लंघन ठरते.
भारतीय मानक ब्युरो कायदा, 2016 च्या कलम 29 सह कलम 17 च्या तरतुदींनुसार, बीआयएस आता या कंपनीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करून कायदेशीर प्रक्रिया सुरु करेल.

संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार, बीआयएस मानक चिन्हांच्या गैरवापराशी संबंधित गुन्ह्यांसाठी दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी तुरुंगवास किंवा पहिल्या उल्लंघनासाठी 2 लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतका तसेच दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या उल्लंघनासाठी 5 लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतका दंड ठोठावण्यात येतो. सक्षम न्यायालयाने निश्चित केल्यानुसार, उत्पादित केलेल्या, विकलेल्या, विक्रीसाठी ठेवलेल्या अथवा अवैध मानक चिन्ह असलेल्या वस्तूंच्या किंमतीच्या दहा पटींपर्यंतची रक्कम किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात.
बीआयएस प्रमाणीकरणाच्या गैरवापराशी संबंधित विश्वासार्ह माहितीच्या आधारावर राबवलेल्या शोध आणि जप्ती मोहिमांसह बीआयएस नियमितपणे बाजारपेठेवर लक्ष ठेवणे आणि अंमलबजावणी कारवाई हाती घेत असते. बनावट अथवा अवैध बीआयएस नोंदणी चिन्हे असलेल्या उत्पादनांची निर्मिती, साठवण, वितरण तसेच विक्री रोखून ग्राहकांचे हित जपण्याच्या तसेच संबंधित कायद्याने आखून दिलेल्या दर्जाच्या मानकांविषयी नियमपालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने या उपाययोजना हाती घेण्यात येतात.
ग्राहकांनी बीआयएस-प्रमाणिकृत उत्पादनांच्या खरेदीपूर्वी बीआयएस केयर अॅप किंवा अधिकृत बीआयएस पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या अस्सलपणाची खात्री करून घ्यावी. बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याचा संशय आला असेल तर किंवा यासंदर्भातील नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित तक्रारी असतील तर योग्य कारवाईसाठी त्यांची माहिती भारतीय मानक ब्युरोकडे नोंदवावी.
***
निलिमा चितळे/संजना चिटणीस/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2292706)
अभ्यागत कक्ष : 32