माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीआयबी मुंबईतर्फे 'तथ्य पडताळणी: चुकीच्या माहितीचा सामना करणे आणि शासकीय संवाद बळकट करणे' या विषयावर आयएमपीसीसी कार्यशाळा


सहभागींच्या तथ्य-पडताळणी आणि संकटकालीन संवाद कौशल्यांना बळकट करणे, तसेच अनुभव व सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करणे हा कार्यशाळेचा उद्देश : पत्र सूचना कार्यालय महासंचालक स्मिता वत्स शर्मा

प्रविष्टि तिथि: 31 JUL 2026 6:27PM by PIB Mumbai

 

मुंबई, 31 जुलै 2026

केंद्र शासनाचे विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम तसेच इतर शासकीय संस्था यांच्यातील परस्पर संपर्कात सुधारणा व्हावी यासाठीच्या गतिशील प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज मुंबईत एनएफडीसी संकुलात पत्रसूचना कार्यालय मुंबई च्या वतीने आंतर माध्यम प्रसिद्धी आणि समन्वय समिती (आयएमपीसीसी)ची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा होत्या. सुमारे 25 शासकीय संस्था आणि सार्वजनिक उपक्रम यांचे 45 हून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत 'तथ्य पडताळणी: चुकीच्या माहितीचा सामना करणे आणि शासकीय संवाद बळकट करणे' या संकल्पनेवर आधारित कार्यशाळा घेण्यात आली. माध्यम संपर्कात कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) आव्हान आणि तथ्य पडताळणी करून योग्य माहिती प्रसारित करण्यासाठी शासकीय विभाग आणि सार्वजनिक उपक्रम यांनी समन्वय साधून कार्य करण्यासाठीच्या पीआयबी मुंबईच्या प्रयत्नांचा ही कार्यशाळा एक भाग होती. सरकारी पोहोच वाढवण्यासाठी धोरणे सामायिक करण्यासाठी मीडिया आणि संवाद तज्ज्ञांना या कार्यशाळेने एकत्र आणले.

उद्घाटन सत्रामध्ये बोलताना पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी शासकीय संस्थांमधील माध्यम आणि संवाद व्यावसायिकांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या वाढत्या आव्हानावर प्रकाश टाकला आणि संशयास्पद मजकूर मोठी समस्या बनण्यापूर्वीच तो ओळखून त्यावर उपाययोजना करण्याच्या गरजेवर भर दिला. त्या म्हणाल्या की, झपाट्याने प्रगत होत असलेले एआय चे तंत्रज्ञान आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारी चुकीची, दिशाभूल करणारी माहिती ही शासकीय विभाग आणि सार्वजनिक उपक्रम यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे. अशात तथ्य पडताळणी अर्थात 'फॅक्ट चेकिंग’ची गरज अत्यंत महत्वाची आहे. संकटाच्या स्थितीत किंवा विपरीत परिस्थितीमध्ये दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होण्याचा धोका जास्त वाढतो अशा स्थितीत अधिक सजगतेने शासकीय विभाग आणि सार्वजनिक उपक्रम यांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन देखील महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी केले.

आंतर माध्यम प्रसिद्धी आणि समन्वय समिती (आयएमपीसीसी) मध्ये विविध शासकीय विभाग आणि सार्वजनिक उपक्रम आणि इतर शासकीय कार्यालये यांचा समावेश आहे. या सर्वांनी परस्पर संवाद कायम ठेवून अशा आव्हानात्मक विषयावर मंथन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.

उद्घाटन सत्रानंतर 'तथ्य पडताळणी: चुकीच्या माहितीचा सामना करणे आणि शासकीय संवाद बळकट करणे' या संकल्पनेवर आधारित सत्रे झाली. पहिल्या सत्रात इंडियन एक्स्प्रेसच्या डेप्युटी कॉपी एडिटर आणि 'फॅक्ट चेक’ विशेषज्ञ अंकिता देशकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून ‘'फॅक्ट चेकची आधुनिक साधने, माहिती पडताळणी पद्धती’ याविषयी सादरीकरण केले.

त्यांनी जगभरात व्हायरल झालेले आणि जाणीवपूर्वक छेडछाड करून तयार केलेले फोटो यावेळी सहभागी प्रतिनिधींना दाखवले व तथ्य पडताळणी नंतर पुढे आलेले वास्तव देखील अधोरेखित केले. ‘फेक न्यूज’ कशा ओळखायच्या, त्यातील मजकुराची पडताळणी कशी करायची, छायाचित्रांची पडताळणी कशी करायची, व्हिडीओ ची पडताळणी कशी केली जाते, डीपफेक, एआय फेक कसे शोधायचे यासोबतच त्याची पडताळणी करणाऱ्या टूल्स ची देखील माहिती दिली. अंकिता देशकर यांनी  चुकीची माहिती (Misinformation), दिशाभूल करणारी माहिती (Disinformation) आणि विपर्यास करणारी माहिती (Malinformation) यातील फरक आणि यामुळे पडणारा प्रभाव यावर विस्तृत विवेचन केले.

यावेळी सहभागी प्रतिनिधींनी विचारलेले प्रश्न आणि उपस्थित केलेल्या शंकांचे देखील त्यांनी निराकरण केले.

पत्र सूचना कार्यालय मुंबई च्या उपसंचालक निकिता जोशी यांनी ‘पीआयबी फॅक्ट चेक: खोट्या माहितीचे तथ्याधारित खंडन करून सत्य माहिती प्रसारित करणे’ या विषयावर सदरीकरण केले. भारत सरकारशी संबंधित व्हायरल होणाऱ्या माहितीची पडताळणी करून तिचे वास्तव जनतेपर्यंत आणण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाचे 'पीआयबी फॅक्ट चेक युनिट’ 2019 पासून कार्यरत आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. 'पीआयबी फॅक्ट चेक युनिट’ची कार्यशैली, त्याची गरज आणि शासकीय संवाद प्रक्रियेमध्ये त्याची गरज याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली.

कार्यशाळेमध्ये सहभागी प्रतिनिधींनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. चुकीची माहिती प्रसाराच्या वाढत्या आव्हानात ही कार्यशाळा एक महत्वाचे पाऊल असल्याचे नमूद करीत पत्र सूचना कार्यालयाच्या पुढाकाराचे कौतुक केले. प्रतिनिधींनी त्यांच्या संस्थेबाबत प्रसारित होणाऱ्या चुकीच्या माहितीवर आधारित पोस्ट आणि त्यावर केलेली कार्यवाही तसेच भेडसावणाऱ्या समस्या देखील मांडल्या.

पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक मध्ये त्यांनी कार्यशाळेची संकल्पना, भूमिका आणि महत्व विशद केले. माहिती सहायक एडगर कोहेलो यांनी भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानाबाबत सदरीकरण केले.

कार्यशाळेचे संचालन यंग प्रोफेशनल नेहा कुलकर्णी यांनी केले व आभार माध्यम आणि संपर्क अधिकारी श्रीयंका चॅटर्जी यांनी मानले.

***

जयदेवी पुजारी स्वामी/नितीन फुल्लुके/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2292658) आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English