पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ओएनजीसीने काणगुणिम इथे गोव्यातील सर्वात मोठ्या कन्व्हेनशन सेंटरचे केले अनावरण


ऊर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटरमुळे गोवा वर्षभर बैठका, प्रोत्साहन, परिषदा आणि प्रदर्शनांचे केंद्र बनणार

Posted On: 30 JUL 2026 6:35PM by PIB Mumbai

पणजी/गोवा, 30 जुलै 2026

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) काणगुणिम येथील प्रगत प्रशिक्षण संस्थेत (एटीआय) ‘ऊर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटर’चे (यूबीसीसी) उद्घाटन केल्यामुळे गोव्यात अधिवेशन आणि व्यावसायिक पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे.

सुमारे 4,000 हून अधिक प्रतिनिधींच्या  आसन क्षमतेसह एकात्मिक सुविधा असलेले हे, गोवा राज्यातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर आहे. यामुळे पुढील वर्षभर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा, प्रदर्शने, कॉर्पोरेट अधिवेशने आणि सरकारी कार्यक्रम गोव्यात आयोजित होतील अशी अपेक्षा आहे.

ओएनजीसीद्वारे 18 आणि 19 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय 'ग्रँड एमआयसीई शोकेस' या कार्यक्रमादरम्यान या केंद्राचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  तेल आणि नैसर्गिक वायू  महामंडळाने  भारतातील वेगाने विस्तारणाऱ्या 'मीटिंग्ज, इन्सेंटिव्ह्ज, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स' (MICE) क्षेत्रात पदार्पण केले आहे.

या कार्यक्रमात ओएनजीसीचे वरिष्ठ अधिकारी, गोवा सरकारचे प्रतिनिधी, पर्यटन क्षेत्रातील संबंधित घटक, आदरातिथ्य क्षेत्रातील दिग्गज, प्रदर्शन आयोजक, कार्यक्रम व्यवस्थापन कंपन्या आणि देशभरातील कॉर्पोरेट प्रतिनिधी सहभागी झाले होते.

‘भारत ऊर्जा सप्ताह’ अर्थात ‘इंडिया एनर्जी वीक’च्या  यशस्वी आयोजनाच्या पार्श्वभूमीवर ओएनजीसीने या केंद्राचे उद्घाटन केले. या केंद्राच्या माध्यमातून महामंडळ आता, व्यावसायिक पर्यटन आणि प्रादेशिक आर्थिक विकास या दोन्ही गोष्टींना चालना देणाऱ्या, परिषदा आणि संमेलनांच्या जागतिक दर्जाच्या  पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये आपला सहभाग वाढवत आहे.

‘ऊर्जा भारत’ या  ब्रँडची ओळख करून देणे आणि त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण हे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. गोव्यात एक प्रमुख संमेलन स्थळ विकसित करण्याच्या ओएनजीसीच्या दृष्टीकोनाचेच हे प्रतीक आहे.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी, गोव्याचे एमआयसीई क्षेत्रातील  स्थान मजबूत करण्यावर ज्ञान सत्रे आयोजित करण्यात आली होती. इंडियन एक्झिबिशन इंडस्ट्री असोसिएशनने (IEIAभारतीय प्रदर्शन उद्योग संघ) गोव्याला एक अग्रगण्य प्रदर्शन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योग, सरकार आणि पायाभूत सुविधा पुरवठादारांमध्ये अधिक सुसंवाद आणि समन्वयाची गरज अधोरेखित केली.

इंडिया कन्व्हेन्शन प्रमोशन ब्युरो (ICPB) आणि गोवा पर्यटन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या दुसऱ्या सत्रात, उत्कृष्ट हवाई संपर्क, हॉस्पिटॅलिटी नेटवर्क, पर्यटन पायाभूत सुविधा आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन अनुभव यांच्या बळावर गोव्याला देशातील परिषदा आणि अधिवेशनांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून विकसित करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली.

प्रतिनिधींना एकात्मिक संकुलाची मार्गदर्शित सफरही घडवण्यात आली. या संकुलात एक अत्याधुनिक कन्व्हेन्शन हॉल, प्रदर्शनासाठी स्वतंत्र जागा, कार्यकारी निवास व्यवस्था, व्यवस्थापन विकास सुविधा आहेत. एकाच छताखाली मोठी अधिवेशने, व्यापार प्रदर्शने, प्रशिक्षण कार्यक्रम, कॉर्पोरेट बैठका आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी हे संकुल आरेखित केले गेले आहे.

पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील संबंधित घटकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून ही नवीन सुविधा पारंपरिक पर्यटन हंगामापलीकडे व्यावसायिक पर्यटकांना आकर्षित करून गोव्याच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत विविधता आणण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पामुळे हॉटेल व्यावसायिक, वाहतूक कंपन्या, कार्यक्रम आयोजक आणि संबंधित सेवा पुरवठादारांसाठी नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

ऊर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटरच्या कार्यान्वयनामुळे, ओएनजीसीने गोव्याला एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच जागतिक दर्जाच्या व्यावसायिक आणि संमेलन सुविधांचा संगम साधणारे ठिकाण म्हणून राज्याच्या वाढत्या प्रतिष्ठेला अधिक बळकटी मिळाली आहे. 

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/सविता म्हसकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 

 


(Release ID: 2291969) अभ्यागत कक्ष : 66
Read this releasein: English