सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुश्राव्य शास्त्रीय गायनाने 33 व्या डॉ.वसंतराव देशपांडे स्मृति संगीत महोत्सवाला प्रारंभ

Posted On: 30 JUL 2026 6:06PM by PIB Mumbai

नागपूर,30 जुलै 2026

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत, दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र (SCZCC), नागपूर यांनी आयोजित  केलेल्या 33 व्या डॉ.वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाला बुधवार, 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता मोठ्या दिमाखात सुरूवात झाली.

या महोत्सवाचे उद्घाटन नागपूर शहर पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, प्रख्यात शास्त्रीय गायिका पद्मश्री शुभा मुद्गल आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.  याप्रसंगी SCZCC च्या उपसंचालिका मिथिला तळवणेकर आणि सहायक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. केंद्र संचालकांच्या हस्ते मान्यवरांचा शाली, स्मृतिचिन्हे आणि रोपे देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री शुभा मुदगल यांच्या श्रवणीय शास्त्रीय गायनाने झाले. यावेळी त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात ‘मधुवंती ‘रागातील  "बरखा में कौ मान करात है" या रचनेने केली, जो विलंबित  रूपक आणि मध्यमलयीतील तालावर आधारित आहे. त्यानंतर त्यांनी भावमधुर दादरा "सैयां बिन लगत बूंद कटारी" सादर केला आणि "झूलें आज ललित हिंदोरे सखियां" या पारंपारिक झुला रचनेने आपल्या गायनाचा समारोप केला.त्यांना तबल्यावर  अनिश प्रधान, हार्मोनियमवर  सुधीर नायक आणि तानपुऱ्यावर सुरभी उबाडे आणि श्रेया सलोडकर यांनी साथसंगत केली.

संध्याकाळच्या दुसऱ्या सादरीकरण सत्रात प्रख्यात सतारवादक  निलाद्री कुमार यांचे मंत्रमुग्ध करणारे सतारवादन झाले.त्यांनी राग ‘जय जयवंती’ने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली आणि राग भैरवीने सांगता केली. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर यांनी साथ केली.

उद्घाटन सोहळ्याला संगीत रसिक आणि कलाप्रेमींचा भरघोस प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

आज गुरुवार, 30 जुलै, 2026 रोजी, या महोत्सवात मुंबईच्या भद्रकाली प्रॉडक्शन्स निर्मित 'देवबाभळी' हे गाजलेले मराठी संगीत नाटक सादर केले जाईल. प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित आणि आनंद ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या या नाटकाचे आतापर्यंत 800 हून अधिक प्रयोग  झाले आहेत.पारंपरिक अभंग आणि समकालीन नाट्य सादरीकरण यांचा संगम असलेल्या या नाटकाला 44 पुरस्कारही मिळाले असून, त्याच्या कलात्मक उत्कृष्टतेसाठी त्याची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली आहे.


पीआयबी मुंबई |सुषमा काणे/संपदा पाटगावकर /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2291927) अभ्यागत कक्ष : 41
Read this releasein: English