रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांना मोठा वेग


राज्यभरात दळणवळण-संपर्क वाढवणाऱ्या प्रकल्पांचे काम वेगाने सुरू

Posted On: 29 JUL 2026 10:33PM by PIB Mumbai

मुंबई,29 जुलै 2026

रेल्वे मंत्रालय, संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे संपर्क-दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विविध प्रकल्पांवर काम करत आहे. नवीन रेल्वे मार्ग, दुपदरीकरण आणि क्षमता वाढवण्याच्या प्रकल्पांमध्ये लक्षणीय प्रगती होत आहे.

शिर्डी परिसर आणि लगतच्या भागातील रेल्वे संपर्क-दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी 'दौंड-मनमाड दुपदरीरीकरण प्रकल्प' नुकताच सेवेत दाखल करण्यात झाला आहे. 'अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन मार्ग प्रकल्पा' अंतर्गत 201 किमी लांबीचा अहिल्यानगर-बीड-वडवणी टप्पा सेवेत दाखल झाला आहे, तर उर्वरित टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. 'राहुरी-शनि शिंगणापूर नवीन मार्ग' आणि 'पुणतांबा-साईनगर शिर्डी दुहेरीकरण प्रकल्पा'ला भूसंपादनासाठी 'विशेष रेल्वे प्रकल्प' म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी भूसंपादनासाठी सक्षम अधिकारी (सीएएलए) नियुक्त करण्यात आले असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून दळणवळण वाढवण्यासाठी अनेक नवीन रेल्वे मार्ग पट्ट्यांचे सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये नाशिक रोड-साईनगर शिर्डी, पुणे-अहिल्यानगर, धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या मार्गांचा समावेश आहे. राज्य सरकारे आणि इतर भागधारकांशी चर्चा केल्यानंतर, तसेच आवश्यक वैधानिक आणि आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतरच रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली जाते, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

सरकारने महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीत मोठी वाढ केली आहे. 2026-27 या वर्षात राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या कामांसाठी 23,926 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद 2009-14 दरम्यानच्या सरासरी वार्षिक तरतुदीपेक्षा 20 पट अधिक आहे.

2014 ते 2026दरम्यान महाराष्ट्रात एकूण 2,585 किमी लांबीचे नवीन रेल्वे मार्ग सेवेत दाखल झाले आहेत. मार्ग सेवेत दाखल होण्याचा सरासरी दर 2009-14 या कालावधीच्या तुलनेत जवळपास चार पटीने वाढला आहे.

1एप्रिल 2026 पर्यंत महाराष्ट्रात 1,42,635 कोटी रुपये अंदाजित खर्चाचे एकूण 5,956 किमी लांबीचे 52 रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये 13 नवीन मार्ग, 2 गेज (रेल्वे मार्ग रुंदी) रूपांतरण  प्रकल्प आणि 37 दुपदरीकरण/बहुपदरीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी मार्च 2026 पर्यंत 34,782 कोटी रुपये खर्च करून 1,598 किमीचे काम पूर्ण होऊन ते सेवेत दाखल झाले आहे.

राज्यात सध्या अनेक महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. यामध्ये अहिल्यानगर-परळी वैजनाथ नवीन मार्ग, वर्धा-नांदेड नवीन मार्ग, इंदूर-मनमाड नवीन मार्ग, जालना-जळगाव नवीन मार्ग, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्ग, पनवेल-चौक दुहेरी मार्ग आणि कसारा-मनमाड तिसरी आणि चौथी मार्गिका यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक दळणवळण वाढेल, कामाची कार्यक्षमता सुधारेल, मालवाहतूक सोपी होईल आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.

वाहतुकीचा अंदाज, तांत्रिक गरजा, दळणवळणाची आवश्यकता, सामाजिक-आर्थिक बाबी आणि उपलब्ध आर्थिक साधनसंपत्ती यांसारख्या अनेक घटकांचा विचार करून रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली जाते. प्रकल्पांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाते. ती भूसंपादन, आवश्यक वैधानिक मंजुरी, वन विभागाच्या परवानग्या तसेच इतर तांत्रिक बाबींची पूर्तता यांवर अवलंबून असते.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

पीआयबी मुंबई |शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2291485) अभ्यागत कक्ष : 157
Read this releasein: English