संरक्षण मंत्रालय
हवाईदलातर्फे नागपूर जवळील घोराड गावात फ्रीडम हेल्थ कॅम्पचे आयोजन
Posted On:
28 JUL 2026 7:41PM by PIB Mumbai
नागपूर, 28 जुलै 2026
‘मिशन लाईफ’ उपक्रमाअंतर्गत, नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर तालुक्यातील घोराड गावात 26 जुलै रोजी 'फ्रीडम हेल्थ कॅम्प' (उत्तम आरोग्यासह स्वातंत्र्याचा उत्सव) या विविध वैद्यकीय सुविधांनी युक्त अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम भारतीय हवाई दलाच्या 'हवाई दल कर्मचारी कुटुंब कल्याण संघटना (प्रादेशिक), मेंटेनन्स कमांड यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता; यातून भारतीय हवाई दलाची समाज कल्याण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रती असलेली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
या शिबिराचे उद्घाटन एअर मार्शल यल्ला उमेश, व्हीएसएम, पीएचडी, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड, आयएएफ यांच्या हस्ते झाले. या शिबिरात 600 हून अधिक गावकऱ्यांना जेनरिक औषधे, कान,नाक आणि घश्याचे विकार, नेत्ररोग, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग आणि दंतसेवा यांसारख्या विविध व्याधींवर मोफत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि विशेषज्ञांचा सल्ला, तसेच सामान्य बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) प्रदान करण्यात आली. सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या मेंटेनन्स कमांड मुख्यालयांचे प्रधान वैद्यकीय अधिकारी एअर व्हाइस मार्शल सचिन एस. शौचे, यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ वैद्यकीय पथकाने सर्वसमावेशक आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. गावातील रहिवाशांची प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि दंत तपासणी देखील करण्यात आली. पुढील वर्षभर, मेंटेनन्स मुख्यालय नियमित अंतराने अशाच प्रकारच्या, विविध वैद्यकीय सुविधांनी युक्त अशी वैद्यकीय शिबिरे आयोजित करणार आहे, जेणेकरून शाश्वत आरोग्य सहाय्यता सुनिश्चित होईल आणि निरोगी समाज वाढीस लागेल.

निरोगी आणि निरामय आरोग्याला चालना देण्यासाठी संपूर्ण शिबिराच्या आवारात फिट फॉर लाईफ आणि ‘हलके खा, योग्य तेच खा’ (इट लाइट, इट राइट) अशा आशयांचे जागृतीपर फलक लावण्यात आले होते. बालकांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, 'हवाई दल कर्मचारी कुटुंब कल्याण संघटना (प्रादेशिक)च्या अध्यक्षा यल्ला श्रीवल्ली यांनी गावातील गरजू मुले तसंच अंगणवाडीतील मुलांना पोषण-आहार संच, क्रीडा साहित्य आणि वह्या-पुस्तकांचे वाटप केले.
'फ्रीडम हेल्थ कॅम्प' हा मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयाद्वारे निरंतर राबवण्यात येणारा समुदाय संपर्क उपक्रम आहे. आगामी वर्षभरात नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या अनेक आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून, ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक आरोग्य पद्धतींबाबत जागरूकता वाढवणे आणि परिसरातील समुदायांच्या कल्याणासाठी अर्थपूर्ण योगदान देणे, हे कमांडचे उद्दिष्ट आहे. यावेळी, भारत सरकारच्या 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत गावात वृक्षारोपण मोहीमही राबविण्यात आली.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2290737)
अभ्यागत कक्ष : 49