गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनडीआरएफ अकादमीतर्फे नागपूर येथे वाहतूक स्वयंसेवकांसाठी दोन दिवसीय रस्ते अपघात प्रतिसाद अभ्यासक्रमाचे आयोजन

Posted On: 28 JUL 2026 7:23PM by PIB Mumbai

नागपूर, 28 जुलै 2026

 

नागपूर येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अकादमीने 27 जुलै 2026 रोजी नागपूरमधील वाहतूक स्वयंसेवकांसाठी दोन दिवसीय रस्ते अपघात प्रतिसाद अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. एनडीआरएफ अकादमीचे कमांडंट (प्रशिक्षण) गुरमिंदर सिंग यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी नागपूरचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) आदित्य मिरखेलकर उपस्थित होते.  

सहभागींना संबोधित करताना गुरमिंदर सिंह यांनी रस्ते सुरक्षा वाढवणे, वाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करणे आणि रस्ते अपघात आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत समन्वित आपत्कालीन प्रतिसादाला समर्थन देण्यामधील प्रशिक्षित वाहतूक स्वयंसेवकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना सहाय्य करताना तसेच समाजाची सेवा करताना शिस्त, नागरी कर्तव्य आणि सांघिक कार्य, याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. रस्ते अपघातानंतरच्या 'गोल्डन अवर'चे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, वाहतूक स्वयंसेवक अनेकदा सर्वप्रथम प्रतिसाद देणारे म्हणून काम करतात आणि वेळेवर मदत पुरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, यामुळे प्राण वाचू शकतात.

उपस्थितांना संबोधित करताना आदित्य मिरखेलकर यांनी वाहतूक स्वयंसेवकांच्या समर्पित सेवेची प्रशंसा केली, आणि शहरातील रस्ते सुरक्षा आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापनात असलेले त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले.

रस्ते अपघाताच्या वेळी प्रतिसाद देण्याबाबत वाहतूक स्वयंसेवकांची क्षमता वाढवण्यासाठी हा दोन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला असून, यामध्ये त्यांना प्रथमोपचार, सीपीआर (CPR), पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अपघातग्रस्तांना सुरक्षितपणे हलवणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता, यासारखी आवश्यक कौशल्ये प्रदान केली जातील. वाहतूक स्वयंसेवक आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्था यांच्यातील समन्वय मजबूत करणे आणि त्याद्वारे सुरक्षित रस्ते आणि सुधारित सार्वजनिक सुरक्षा प्रदान करणे हे देखील या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमातून सामाजिक लवचिकता वाढवण्याच्या आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी नागरिक स्वयंसेवकांची सज्जता वाढवण्याप्रति एनडीआरएफ अकादमीची वचनबद्धता प्रतिबिंबित होते.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2290725) अभ्यागत कक्ष : 38
Read this releasein: English