सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पारंपरिक कारागिरांसाठी कर्ज उपलब्धता बळकट करण्याच्या उद्देशाने अमरावतीत पीएम विश्वकर्मा कर्ज उत्सवाचे आयोजन

Posted On: 28 JUL 2026 6:04PM by PIB Mumbai

नागपूर, 28 जुलै 2026

 

‘पीएम विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत, कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे, ‘पीएम विश्वकर्मा कर्ज उत्सव’ या विशेष उपक्रमाचे, 24 जुलै 2026 रोजी अमरावती येथे आयोजन करण्यात आले होते. उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांच्या उपजीविकेची साधने वृद्धिंगत करण्यासाठी, पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत उपलब्ध असलेले संस्थात्मक कर्ज आणि इतर लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक ई. रतन कुमार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पुणे चे विभागीय प्रमुख अजय कुमार सिंग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) विकास आणि सुविधा कार्यालय, नागपूरचे संचालक डॉ. व्ही. आर. सिरसाठ हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, डॉ. व्ही. आर. सिरसाठ यांनी ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचे प्रमुख लाभ अधोरेखित केले. यामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण, अत्याधुनिक अवजारांचा संच, विपणन सहाय्य, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सची उपलब्धता आणि उद्योग विस्तारासाठी सवलतीच्या दरातील कर्ज यांचा समावेश आहे. ही योजना सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी या तत्त्वांवर आधारित आहे, ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या पारंपारिक कौशल्यांसाठी पीएम विश्वकर्मा ओळखपत्र आणि प्रमाणपत्र दिले जाते, असे त्यांनी नमूद केले.

या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना दररोज 500  रुपये विद्यावेतनासह कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक अवजारांच्या संचांचे घरपोच वितरण, सवलतीच्या दरात कर्ज सुविधा आणि 'पीएम विश्वकर्मा' प्रदर्शने आणि 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' (OSOP) उपक्रमांद्वारे विपणनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे कारागिरांना उत्पादकता वाढवणे, मोठ्या,  व्यापक बाजारपेठांपर्यंत पोहोचणे तसंच, समृद्धी आणि  शाश्वत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होते, असंही ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना ई. रतन कुमार यांनी 'विश्वकर्मा' योजनेतील लाभार्थ्यांना,  'कर्ज उत्सव' आणि या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या कर्ज सुविधांचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवावा आणि यशस्वी उद्योजक म्हणून पुढे यावे असे आवाहन करत प्रोत्साहित केले.

या 'कर्ज उत्सवा'ला, ‘विश्वकर्मा’ योजनेचे सुमारे 400  लाभार्थी उपस्थित होते. यावेळी  मान्यवरांनी उपस्थितांना 'पीएम विश्वकर्मा योजने'च्या विविध घटकांबाबत , तसेच त्यांचा उद्योग अद्ययावत करण्यासाठी आणि सामाजिक-आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संस्थात्मक कर्जाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान, पात्र विश्वकर्मा लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीची पत्रे आणि धनादेश वितरित करण्यात आले, ज्यामुळे त्यांना व्यवसायाच्या विकासासाठी परवडणाऱ्या दरात वित्तपुरवठा मिळणे  सुलभ झाले.

'पीएम विश्वकर्मा कर्ज उत्सवाच्या' माध्यमातून पारंपरिक कारागीर परिसंस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. कर्ज उपलब्धता, कौशल्य विकास, आधुनिक साधने आणि बाजारपेठेशी संलग्नता या गोष्टी सहज उपलब्ध व्हाव्यात याची सुनिश्चिती करत  सर्वसमावेशक आर्थिक विकास आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यात योगदान दिले जात आहे. 

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सविता म्‍हस्कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2290620) अभ्यागत कक्ष : 52
Read this releasein: English